ठाणे महानगरपालिकेतील बारा विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणा-या सफाई कामगारांना ‘समान काम समान वेतन’ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाणे- ठाणे महानगरपालिकेतील बारा विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणा-या सफाई कामगारांना ‘समान काम समान वेतन’ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गुरुवारच्या महासभेत या संदर्भातील ठराव मंजूर करण्यात आल्याने २ हजार ७० कंत्राटी कामगारांना महानगरपालिकेच्या कर्मचा-यांप्रमाणे वेतन मिळणार आहे.
महानगरपालिकेत सफाई कामगारांबरोबर २ हजार ७० कंत्राटी पद्धतीने सफाई काम करणारे कर्मचारी आहेत. त्यांनाही महानगरपालिकेच्या कर्मचा-यांप्रमाणे वेतन द्यावे, यासाठी म्युनिसिपल लेबर युनियन दहा वर्षापासून लढत आहे. २००१मध्ये युनियनने यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. नोव्हेंबर २०१३ मध्ये न्यायालयाने या कामगारांना ‘समान काम समान वेतन’ द्यावे, असे महापालिकेला आदेश दिले होते.
पालिकेने यासंदर्भात महासभेत ठराव करावा लागेल, असे न्यायालयाला सांगितले. त्यानुसार न्यायालयाने २० नोव्हेंबरच्या आत याबाबतचा ठराव करावा, तसेच २५ नोव्हेंबर रोजी या ठरावाची प्रत न्यायालयाला सादर करण्याचे आदेश दिले होते.
मागील दोन महासभेत हा ठराव प्रशासनाकडून मांडण्यात आला. परंतु तो काही कारणास्तव मागे राहत होता. अखेर गुरुवारच्या महासभेत हा ठराव मंजुरीसाठी ठेवण्यात आला. त्याला मंजुरी देण्यात आली.
कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन मिळावे, यासाठी आमचा मागील दहा वर्षापासून संघर्ष सुरू होता. अखेर पालिकेने उशिरा का होईना ठराव मंजूर केला. त्यामुळे आता या कामगारांना न्याय मिळणार आहे.
– रवी राव, कार्याध्यक्ष, म्युनिसिपल लेबर युनियन