वन विभागाच्या जमिनीवर घर असलेल्या माथेरानमधील काही नागरिकांनी ३० वर्षाची लीज संपूनही वाढवून घेतलेली नाही, अशा १०४ भूखंडधारकांना माथेरानच्या महसूल अधीक्षक कार्यालयाने नोटिसा बजावल्या आहेत.
माथेरान – वन विभागाच्या जमिनीवर घर असलेल्या माथेरानमधील काही नागरिकांनी ३० वर्षाची लीज संपूनही वाढवून घेतलेली नाही, अशा १०४ भूखंडधारकांना माथेरानच्या महसूल अधीक्षक कार्यालयाने नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे किमान आपण राहत असलेली जागा आपल्याच ताब्यात कायम ठेवण्यासाठी भूखंडधारकांनी अधीक्षक कार्यालयात धावपळ सुरू केली आहे. दरम्यान ही अंतिम नोटिस असल्याने भूखंडधारकांनी कागदोपत्रांची कार्यवाही तत्काळ पूर्ण करून लीज पुन्हा वाढवून घ्यावी, असे आवाहन अधीक्षक एस. ए. कोळी यांनी केले आहे.
माथेरान गिरिस्थानी वसलेल्या ५१२ भूखंडधारक हे वन विभागाचे लीजधारक आहेत. ३० वर्ष लीजवर दिलेल्या या भूखंडाचा महसूल गोळा करण्याचे काम माथेरान अधीक्षक कार्यालय करत आहे. मात्र, १९८५ पासून किमान २०० भूखंडधारकांनी लीजची मुदत संपूनही वाढवून घेतली नाही. या भूखंडधारकांना गेल्या दोन वर्षापासून अधीक्षक कार्यालयाकडून नोटिसा बजावल्या जात आहेत.
दोन वर्षात २०० पैकी फक्त ९४ भूखंडधारकांनी आपली कागदपत्रे महसूल कार्यालयाकडे जमा केली आहेत. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी अधीक्षक कार्यालयाने उर्वरित १०४ भूखंडधारकांना अंतिम नोटिस बजावली आहे. मात्र, त्यानुसार लीज वाढवण्याची संधीही अधीक्षक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार या १०४ भूखंडधारकांनी मृत्यूपत्र, वारस नोंदी अशी कागदपत्रे अधीक्षक कार्यालयात जमा करण्यास सुरुवात केली आहे.
ठरावीक मुदतीत १०४ भूखंडधारकांनी कागदपत्रे सादर न केल्यास महसूल विभाग जमीन ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू करेल. तसेच काही भूखंडावर अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. या बांधकामांवर पालिकेने कोणती कारवाई केली, याची विचारणाही नगरपालिकेकडे करणार आहोत.- एस. ए. कोळी, अधीक्षक, माथेरान