दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याला गुरुवारी नागपूर भेटीत हिंदुत्ववाद्यांच्या प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागले.
नागपूर- दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याला गुरुवारी नागपूर भेटीत हिंदुत्ववाद्यांच्या प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागले. त्याच्या कारवर दगडफेक झाली. त्याची जाहीर सभा उधळण्याचा प्रयत्न झाला. जाहीर सभेत त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला.
व्यासपीठावरच असलेला एक तरुण त्याच्या दिशेने धावला. पण तो पोहोचण्याआधीच त्याच्याभोवती कडे केलेल्या तरुणांनी त्याला पकडले. याच्या काही मिनिटे आधी कन्हैयावर चप्पल फेकण्यात आली. या दोन्ही घटनांनी सभेत प्रचंड गोंधळाचे वातावरण होते.
कन्हैयाला आपले भाषण दोन्ही वेळा काही मिनिटे थांबवावे लागले. अशा ताणतणावातही कन्हैयाने आपल्या खास शैलीत धडाकेबाज भाषण करून सभा जिंकली. तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये त्याला विरोध करणा-या सुमारे २५ हिंदुत्ववाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
तासाभराच्या सभेत आपल्यावर फेकलेली चप्पल दाखवत तो म्हणाला, आपण घाबरत नाही. नागपूर ही संघभूमी नाही, दीक्षाभूमी आहे. ही गोळवलकरांची भूमी नाही, आंबेडकरांची आहे. संघवाले नागपूरला बदनाम करीत आहेत. नरेंद्र मोदी, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर कन्हैयाने सडकून टीका केली.
मोदी म्हणजे देश नाही, संघ म्हणजे संसद नाही आणि मनुस्मृती ही घटना नाही, असे तो म्हणाला तेव्हा सभेने एकच जल्लोष केला. प्रगतशील छात्र युवा संघर्ष समितीच्या नेतृत्वात डाव्या व पुरोगामी विचारांच्या विविध राजकीय पक्षप्रणीत विद्यार्थी संघटनांनी येथील काँग्रेसनगरातील धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात त्याचे व्याख्यान आयोजित केले होते. आंबेडकर जयंतीचा दिवस आणि कन्हैयाची लोकप्रियता यामुळे नागपूरकरांनी प्रचंड गर्दी केली होती.
राज्यातला त्याचा हा पहिलाच कार्यक्रम होता. सकाळी विमानाने तो नागपुरात आला तेव्हा विमानतळावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या कारवर दगडफेक केली. कारची काच फुटली. पण कुणाला दुखापत झाली नाही. नंतर त्याने दीक्षाभूमीवर जाऊन दर्शन घेतले. कन्हैयाचे हातपाय तोडण्याची भाषा हिंदुत्ववाद्यांनी केल्याने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
तुडुंब भरलेल्या सभागृहात कन्हैयाने काही मिनिटे भाषण केले तेव्हा लोकांमध्ये आधीच दडून बसलेल्या अभाविपच्या काही तरुणांनी भारतमाता की जय, म्हणून घोषणा सुरू केल्या आणि एकच गोंधळ उडाला. त्यात एक चप्पल त्याच्या दिशेने फेकण्यात आली. निदर्शक आणि आयोजक विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड हाणामारी झाली.
गडबड करणा-यांना पोलिसांनी बाहेर काढले. पण या गोंधळात कन्हैयाला दहा मिनिटे भाषण थांबवावे लागले. त्यानंतर त्याने भाषण सुरू केले तेव्हा व्यासपीठावर दबा धरून बसलेल्या एका तरुणाने कन्हैयावर हल्ल्याचा प्रयत्न केला. पुन्हा गोंधळ सुरू झाला. पोलीस असताना गडबड कशी होते म्हणून आयोजक पोलिसांशी हुज्जत घालू लागले. पोलीसही गोंधळले होते. आणखी किती विरोधक सभागृहात आहेत या संशयाने पोलीसही धास्तावले. पण नंतर सभा व्यवस्थित पार पडली.