शुक्रवार सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक काही काळ ठप्प झाली आहे.
मुंबई- कामशेत आणि वडगावदरम्यान सांयकाळी ४.१३ वाजण्याच्या सुमारास रेल्वे रुळाखालील खडी वाहून गेल्याने या मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतर ४.४५ वाजेपर्यंत अप मार्गावरील दुरुस्तीचे काम पूर्ण करून या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबई आणि पुण्याकडे येणा-या लांब पल्ल्यांच्या वाहतुकीला त्याचा मोठा फटका बसला.
पुणे जिल्ह्यातील कामशेत, कान्हेफाटा, वडगाव, साते या गावांत शुक्रवारी मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पाण्याने घुसखोरी केली होती. तसेच मावळ तालुक्यातही पावसाची संततधार होती.
द्रुतगती मार्गावर ओझर्डेजवळही मोठया प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. तसेच लोणावळा-खंडाळादरम्यान जोरदार पावसामुळे कामशेत बोगदा ते उर्से रस्त्या दरम्यान मोठया प्रमाणात पाणी सोचले होते. त्यामुळे वाहतूक बराच काळ विस्कळीत होती. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जुना महामार्ग बंद ठेवण्यात आला होता.