सौदी अरेबियात एका घराला लागलेल्या भीषण आगीत १० भारतीयांचा मृत्यू झाला. इतर सहा जण जखमी झाले आहेत. सौदीतील नजरान येथे ही घटना घडली.
नवी दिल्ली- सौदी अरेबियात एका घराला लागलेल्या भीषण आगीत १० भारतीयांचा मृत्यू झाला. इतर सहा जण जखमी झाले आहेत. सौदीतील नजरान येथे ही घटना घडली. आगीत खाक झालेल्या घरात हे सर्व कामगार राहत होते. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या घटनेची माहिती ट्विटरवरून दिली. जेद्दाह येथील भारतीय वाणिज्य दूतावासातील अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत, अशी माहितीही स्वराज यांनी दिली.
सौदी अरेबियात एका घराला आग लागली असून या आगीत १० भारतीयांचा मृत्यू झाला तर सहाजण जखमी आहेत. सौदीतील नजरान येथे ही घटना घडली आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.
सौदी अरेबियातील नजरान येथे भारतीय आणि बांगलादेशी नागरिक राहत होते. ते राहत असलेल्या एका घराला अचानक आग लागली. या आगीत ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये १० भारतीय नागरिक तर एकाची ओळख अद्यापही पटलेली नाही. जखमी झालेल्या सहाजणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरून दिली.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या एका कामगाराचा मृतदेह भारतात आणण्यासाठी स्वराज यांच्याकडे मदत मागितली आहे. त्यावर आपण जेद्दाह येथील भारतीय दूतावासातील अधिका-यांशी या संदर्भात बोललो आहोत. नजरान जेद्दाह येथून ९०० किलोमीटरवर आहे. अधिकारी नजरान येथील गव्हर्नरांच्या संपर्कात आहेत. ते आपल्याला आगीच्या घटनेची क्षणाक्षणाची माहिती देत आहेत, असे स्वराज यांनी सांगितले.
सौदी गॅजेटच्या वृत्तानुसार, सहा जखमींमध्ये ४ भारतीय आहेत. या घटनेची विस्तृत माहिती मिळालेली नाही, असे रियाद येथील भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आले.