चिल्लर समजल्या जाणारे ५० पैशांचे नाणे सरकारने अद्याप चलनातून बाद केलेले नसताना, यावरून व्यापारी व ग्राहकांत खटके उडत आहेत.
मुंबई- किरकोळ खरेदी-विक्रीच्या व्यवहारात सुट्या पैशांच्या चणचणी कायमचे दुखणे आहे. २५ पैशांचे नाणे सरकारी चलनातून बाद करण्यापूर्वीच व्यापा-यांनी ते स्वीकारणेही बंद केले होते. त्यापाठोपाठ आता ५० पैशांचा वांदा होऊन बसला आहे. अनेक व्यापारी, दुकानदार, वाहनचालक ५० पैसे स्वीकारण्यास नकार देत आहेत. हे नाणे सरकारने अद्याप चलनातून बाद केलेले नसताना, यावरून व्यापारी व ग्राहकांत खटके उडत आहेत. काळापैसा आणि बनावट नोटांना पायबंद घालण्यासाठी रिझव्र्ह बँकेने २००५ पूर्वीच्या सर्व नोटा बँकेत जमा करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, २५ पैशांप्रमाणेच मुंबईतील बेस्ट बसेस सोडून इतर ठिकाणी ५० पैशांचे नाणे निर्णयाची वाट न पाहता चलनातून बाद होऊ लागले आहे.
चिल्लर म्हणून समजल्या जाणा-या चलनात ५० पैसे, १ रुपया, २ रुपये, ५ रुपयांची आणि १० रुपयांची नाणी आहेत. शुद्ध निकेल धातूपासून बनलेल्या गोलाकार ५० पैशांच्या नाण्याचे वजन ५ ग्रॅम असून महागाईमुळे व्यापा-यांनीही ५० पैशांची किंमत कमी केली आहे. मुखशुद्धी करणा-यांत बडीशेपची पुडी, लिमलेटच्या गोळय़ा आदी ठरावीक वस्तू वगळता अन्य कोणतीही वस्तू ५० पैशांत खरेदी करता येत नाही. त्यामुळे चलनात जरी ५० पैशांचे नाणे असले तरी व्यापा-यांच्या ‘हम करे सो’ कायद्यामुळे ते वगळले जात आहे.
बस सेवा वगळता टॅक्सी व रिक्षाचालकांना एखाद्या प्रवाशाने ५० पैशांचे नाणे दिल्यास चालक ते स्वीकारत नाहीत. हॉटेल व किराणा मालाच्या दुकानदारांनीही ५० पैशांचे नाणे स्वीकारण्यास नकार देण्यास सुरुवात केली आहे. टपरीवाले बडीशेपची पुडी अथवा गोळी घेताना ५० पैशांत एक न देता रुपयाच्या दोन घ्या, असा सल्ला देताना दिसतात. अनेक ग्राहकच ५० पैशांचे नाणेच स्वीकारत नाहीत. मग, आम्ही तरी ते का स्वीकारावे, असे अनेक हॉटेल व किराणा मालच्या दुकानदारांनी ‘प्रहार’शी बोलताना सांगितले.
५० पैशांचे नाणे चलनातून बाद करण्यात आलेले नाही. त्यामुळे ते व्यवहारात वापरण्यात कोणतीही अडचण नाही. तसेच फाटक्या नोटा व साठवलेली नाणी बँकेत स्वीकारली जातात. फाटक्या नोटांच्या बदल्यात बँकांमधून चांगल्या नोटा दिल्या जातात. ५० पैशांचे नाणे स्वीकारू नये, असे रिझव्र्ह बँकेने अद्याप जाहीर केलेले नाही. एखादा व्यापारी अथवा दुकानदार ५० पैशांचे नाणे स्वीकारत नसल्यास ग्राहकाने तक्रार केल्यास स्थनिक पोलिस कारवाई करू शकतात. – बी. पी. विजेंद्र, विभाग प्रमुख, चलन व्यवस्थापन विभाग, रिझव्र्ह बँक
ग्राहकांना ५० पैशांचे सुट्टे नाणे दिल्यास ते स्वीकारत नाहीत. ग्राहक जर ते स्वीकारत नसतील तर मग आम्ही तरी का स्वीकारायचे? – सुकेश शेट्टी, सचिव, आहार हॉटेल व्यावसायिक संघटना