पंतप्रधान मोदींच्या रशियन दौ-याच्या पार्श्वभूमीवर ४० हजार कोटी रुपयांच्या रशियन हवाई क्षेपणास्त्र यंत्रणेला संरक्षण खरेदी परिषदेने मंजुरी दिली.
नवी दिल्ली- पंतप्रधान मोदींच्या रशियन दौ-याच्या पार्श्वभूमीवर ४० हजार कोटी रुपयांच्या रशियन हवाई क्षेपणास्त्र यंत्रणेला संरक्षण खरेदी परिषदेने मंजुरी दिली. भारत रशियाकडून ‘एस-४००’ त्रिंफ ही क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी करेल.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण खरेदी परिषदेची बैठक झाली. यात रशियाकडून पाच हवाई क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदीचा निर्णय घेण्यात आला. ४०० किलोमीटरच्या टप्प्यातील विमान, क्षेपणास्त्र व ड्रोन विमाने पाडण्याची या यंत्रणेची क्षमता आहे. या यंत्रणेमुळे राष्ट्रीय हवाई संरक्षण क्षमता वाढू शकेल.
या यंत्रणेची अंदाजे किंमत ४० हजार कोटी रुपये आहे. चीननंतर ही यंत्रणा विकत घेणारा भारत हा दुसरा देश ठरला आहे.
स्टेल्थ तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या विमानांनाही ही यंत्रणा अचूकपणे टिपते. आंतरखंडीय व अतिवेगवान क्षेपणास्त्रांना निष्प्रभ करण्याची त्याची क्षमता आहे.
या बैठकीत लष्कराच्या सहा तुकडय़ांना ‘पिनाका रॉकेट’ देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. प्रत्येक तुकडीला १८ लॉँचर देण्यात येतील. प्रत्येक लॉँचरमधून १२ रॉकेट डागता येऊ शकतात.