राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात सुमारे २९७ कोटींचा औषध खरेदी घोटाळा उघड झाल्याने फडणवीस सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहे.
मुंबई- राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात सुमारे २९७ कोटींचा औषध खरेदी घोटाळा उघड झाल्याने फडणवीस सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी याप्रश्नी शिवसेना-भाजपा सरकारची कोंडी केल्याने दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औषध खरेदीत गैरव्यवहाराची कबुली दिली होती. त्यानंतर घाईगडबडीत आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी या प्रकरणात आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांच्या निलंबनाची घोषणा केली होती.
खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी सरकारने या घोटाळय़ाचा ठपका ठेवत डॉ. पवार यांचे तडकाफडकी निलंबन केले असले तरी या भ्रष्टाचारामागील खरा ‘खलनायक’ अद्याप मोकाटच असून औषध खरेदीतील मोठे रॅकेट बाहेर काढण्यासाठी प्रथम आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची ‘सीआयडी’मार्फत चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.
आगामी पावसाळी अधिवेशनात युती सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधकांनी रणनीती आखली आहे. २९७ कोटींच्या औषध खरेदी घोटाळय़ावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विरोधकांनी आवाज उठल्यानंतर शिवसेनेचे आमदार व राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार डॉ. सतीश पवार यांना निलंबित केल्याचे जाहीर करताना आरोग्य खात्याच्या संचालकपदाची धुरा डॉ. मोहन जाधव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
‘राष्ट्रीय आरोग्य अभियान’अंतर्गत २०१४-१५ या आर्थिक वर्षात औषध खरेदीचा निर्णय घेण्यात आला होता. या योजनेंतर्गत एकूण २०१ प्रकारच्या औषधांची खरेदी करण्यात आली आहे. यातील २९७ कोटींची कोणतीही खरेदी झाली नसल्याचेही आरोग्यमंत्री सावंत यांनी निवेदनाद्वारे सांगितले होते. मात्र राज्यातील २६ महापालिका आणि ६५ नगरपालिकांसाठीही औषध खरेदी झाल्याचे सूत्रांकडून समोर आले आहे.
औषध खरेदीतील भ्रष्टाचाराची मागील वर्षी पावसाळी अधिवेशनात माहिती देऊनही आरोग्यमंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. या गैरव्यवहाराची निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याची मागणी मुंडे यांनी केली होती.
या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीसाठी डॉ. भगवान सहाय यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला महिनाभरात आपल्या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या चौकशीत दोषी आढळणा-यांवर माजी न्यायमूर्तीच्या देखरेखीखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे चौकशीचे आश्वासन सरकारने दिले होते.
मात्र डॉ. पवारांच्या अध्यक्षतेखाली औषधांची खरेदी झाली असली तरी वरच्या पदावर बसून सूत्रे हलवणारे खरे खलनायक कोण? याचा छडा लावण्यासाठी छोटे मासे पकडण्यापेक्षा बडे मासे शोधा, असा आग्रह विरोधकांकडून धरला जात आहे.
आरोग्य संचालकपदाची सूत्रे मोहन जाधवांकडे
डॉ. सतीश पवार यांचे तडकाफडकी निलंबन झाल्यानंतर आरोग्य विभागाने सेवाज्येष्ठतेनुसार आरोग्यमंत्री दीपक सावंत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. मोहन जाधव यांच्याकडे आरोग्य संचालकपदाची सूत्रे सोपवली. जाधव यांनी ३० वर्षाहून अधिक काळ आरोग्य विभागात सेवा केली आहे.
काही वर्षापूर्वी त्यांनी कोल्हापूर व रत्नागिरी ग्रामीण रुग्णालयाची जबाबदारी उत्तमरित्या सांभाळली होती. ‘क्षयरोग निर्मूलन विभाग’, ‘महाराष्ट्र एड्स कंट्रोल सोसायटी’ आदी ठिकाणी त्यांनी काम केले आहे.