शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील खासगी शाळांतील २५ टक्के राखीव प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत सोमवारी १८ तारखेला संपत आहे.
मुंबई- शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील खासगी शाळांतील २५ टक्के राखीव प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत सोमवारी १८ तारखेला संपत आहे. मात्र मागील चार वर्षाप्रमाणे या प्रवेशासाठीची अनागोंदी यंदाच्या प्रवेशासाठी सुरू आहे.
ऑनलाईन नोंदणीसाठी दिलेल्या संकेतस्थळावर बहुतांश कागदपत्रे अपलोड होत नसल्याने आणि त्यातही काही सुधारणा करण्याची संधी या यंत्रणेत नसल्याने असंख्य पालकांना रविवापर्यंत आपल्या मुलांच्या प्रवेशासाठीचे अर्ज भरता आले नसल्याची माहिती समोर आली आहे.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल, मागास, अल्पसंख्याक आदी प्रवर्गातील मुलांना पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळावा यासाठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया ही ३१ मार्चपासून सुरू झाली आहे. यासाठी राज्य प्राथमिक शिक्षण विभागाकडून https://rte25admission.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली आहे.
मात्र मागील वर्षाप्रमाणेच यंदाही हे संकेतस्थळ योग्य स्थितीत चालत नसल्याच्या तक्रारी पालकांकडून केल्या जात आहेत. त्यातच अनेक कागदपत्रे डाऊनलोड करताना त्यासाठीच्या आकाराची एडिट करण्याची यंत्रणा या संकेतस्थळावर नसल्याने त्याचा फटका पालकांना बसत आहे.
एखाद्या कागदोपत्राचा आकार अधिक आणि कमी झाल्यास या संकेतस्थळावर भरलेली संपूर्ण प्रक्रियाच बाद होण्याचे प्रकार सर्रास होत असल्याने पालकांना प्रवेशासाठी अनेकदा नोंदणी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. यासाठी शिक्षण विभागाकडून जाणीवपूर्वक हलगर्जी करण्यात येत असल्याचा आरोप अनुदानित शिक्षण बचावचे प्रा. सुधीर परांजपे यांनी केला आहे.
शाळांची नोंदणी कमीच दाखवली
यंदाही महापालिकेकडून खासगी शाळांची संख्या महापालिकेच्या कार्यक्षेत्रात सुमारे ८०० च्या दरम्यान असताना त्या केवळ ३१७ पर्यंतच दाखवून अनेक श्रीमंत शाळांची या ऑनलाईनमध्ये नोंदणीच केली गेली नसल्याचा आक्षेप मागासवर्गीय पालक-विद्यार्थी संघटनेचे प्रमुख प्रवीण यादव यांनी घेतला आहे.
एकीकडे शाळा कमी दाखवणे आणि ऑनलाईनसाठीची यंत्रणा चुकीचे ठेवत हे सरकार धनदांडग्याच्या शाळांत गोरगरिबांच्या मुलांना प्रवेशापासून वंचित ठेवण्यासाठी उद्योग करत असल्याचा आरोप यादव यांनी केला आहे. ऑनलाईन नोंदणीची मुदत किमान आठवभर वाढवून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दोन दिवसांपासून संकेतस्थळच बंद
प्राथमिक शिक्षण विभागाकडून राज्यभरातील खासगी शाळांच्या प्रवेशासाठी एकच संकेतस्थळ असून हे मागील दोन दिवसांपासून चालतच नाही. १५ ते १६ एप्रिलदरम्यान पूर्णपणे बंद होते. यासाठी अनेक पालकांनी प्रयत्न केला असता त्यांना आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करता आले नाही. यामुळे या प्रवेशासाठीची मुदत वाढवण्याची मागणी अनुदानित शिक्षण बचावचे प्रमुख के. नारायणन यांनी केली आहे.