धुळवड साजरी करण्यासाठी पत्त्यांचा डाव मांडल्याने त्यास शेजाऱ्याने घरासमोर पत्ते खेळण्यास विरोध केला.
भिवंडी- धुळवड साजरी करण्यासाठी पत्त्यांचा डाव मांडल्याने त्यास शेजाऱ्याने घरासमोर पत्ते खेळण्यास विरोध केला. या वादातून झालेल्या भांडणात जुगा-यांनी चाकू, लोखंडी सळई, लाकडी दांडक्यांनी घरात शिरून हल्ला केल्याने एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री पूर्णा येथील दालमिल कंपाऊंडमध्ये घडली आहे. या हल्ल्यात मृत्यू झालेल्याचे नाव राजन शिल्पकार (३०) असे आहे. त्याचा भाऊ राजकुमार ( २४) हा गंभीर झाल्याने त्याच्यावर ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
या खुनाचा नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी चारही खुन्यांना सोमवारी सायंकाळी अटक केली आहे. सागर हरिलाल राठोड, विजय ऊर्फ विज्या खेमू राठोड, आकाश बाबू चव्हाण, अविनाश बाबू चव्हाण असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शिल्पकार बंधू व हल्लेखोर हे गोदामात हमालीचे काम करतात.
होळीची सुट्टी असल्याने हल्लेखोरांनी राजन यांच्या घरासमोर तीन पत्त्यांचा डाव मांडला होता. त्यास राजनचा भाऊ दिनेशकुमार याने विरोध केला व येथे खेळू नका असे सुनावले. त्याचा राग आल्याने सागर, विजय, आकाश, अविनाश या चौघांनी हातात चाकू, लोखंडी सळई, लाकडी दांडके घेऊन शिल्पकार बंधूच्या घरात शिरले व त्यांनी राजकुमार याच्या गळ्यावर, मनगटावर, गाळय़ावर गंभीर दुखापती केल्या.
यावेळी लघुशंकेसाठी घराबाहेर पडलेला राजन घरात येताच त्याच्या छाती, बरगडी, पाठीवर, कमरेवर चाकूने वार करून लोखंडी सळई, लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत राजन जागीच ठार झाला तर दिनेशकुमार अंधाराचा फायदा घेऊन पळाल्याने सुदैवाने बचावला आहे.