आयपीएलच्या सहाव्या मोसमातील ‘स्पॉटफिक्सिंग’च्या पार्श्वभूमीवर हॉकीमध्ये अशा गोष्टी घडू नयेत, म्हणून भारतीय हॉकी संघाच्या राष्ट्रीय शिबिरात हॉकीपटूंसाठी विशेष शिकवणी वर्ग घेण्यात आला.
नवी दिल्ली – आयपीएलच्या सहाव्या मोसमातील ‘स्पॉटफिक्सिंग’च्या पार्श्वभूमीवर हॉकीमध्ये अशा गोष्टी घडू नयेत, म्हणून भारतीय हॉकी संघाच्या राष्ट्रीय शिबिरात हॉकीपटूंसाठी विशेष शिकवणी वर्ग घेण्यात आला. सिनियर (पुरुष) संघाचा कर्णधार सरदार सिंगनेही ही माहिती दिली. फिक्सिंगच नव्हे तर उत्तेजक द्रव्य चाचणीबाबतही (डोप) हॉकीपटूंना अवगत करण्यात आले, असे त्याने म्हटले.
‘‘मुख्य प्रशिक्षक मायकेल नॉब्ज आणि ‘साई’च्या प्रमुखांनी बंगळूरुतील राष्ट्रीय शिबिरात स्पॉटफिक्सिंग आणि डोपिंगबाबत हॉकीपटूंना विशेष वर्ग घेतला. अनोळखी व्यक्तींपासून दूर राहावे. तसेच कुणी अज्ञात व्यक्तीने संपर्क साधल्यास तात्काळ संघव्यवस्थापनाशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आल्याचे,’’ सरदारने सांगितले. रॉटरडॅममध्ये (हॉलंड) होणा-या एफआयएच जागतिक हॉकी लीग राउंड ३ (उपांत्य फेरी) स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी भारताचे पुरुष आणि महिला सिनियर हॉकीपटू प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. त्यावेळी सरदारने शिबिरातील प्रमुख आणि उल्लेखनीय गोष्टींचा उलगडा केला.
क्रिकेटप्रमाणे हॉकीत भ्रष्टाचार होऊ शकतो का, यावर ‘‘हॉकीमध्येही आता खूप पैसा येत आहे. क्रिकेटमध्ये आयपीएल तर हॉकीत ‘हॉकी इंडिया लीग’ (एचआयएल) आहे. क्रिकेटपटूंप्रमाणे हॉकी इंडिया लीगमध्ये हॉकीपटूंना लक्ष्य केले जाऊ शकते. मात्र त्यावेळी तो क्रीडापटू परिस्थिती कशी हाताळतो, यावरच खूप काही अवलंबून आहे,’’असे सरदारने सांगितले.
दरम्यान, जागतिक हॉकी लीग राउंड ३ (उपांत्य फेरी) मध्ये सवरेत्तम कामगिरी होण्यासाठी भारताच्या हॉकीपटूंना सातत्य राखणे आवश्यक आहे, असे हॉकी इंडियाचे हाय परफॉर्मन्स संचालक रोइलंट ओटमन्स यांनी म्हटले. १३ ते २३ जून दरम्यान होणारी हॉकी लीग राउंड ३ स्पर्धेकडे २०१४ वर्ल्डकपची पात्रता फेरी म्हणून पाहिले जात आहे.
यावेळी हॉकी इंडियातर्फे माजी सवरेत्तम हॉकीपटू आणि माजी ऑलिंपियन अलॅन स्कॉफिल्ड यांना दोन लाखाचा धनादेश देऊन गौरवण्यात आले. १९८० मॉस्को ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्या भारताच्या हॉकी संघात त्यांचा समावेश होता. तसेच एफआयएच हॉकी लीग राउंड २ सवरेत्तम ठरलेल्या सरदार सिंग आणि जसप्रीत कौरला प्रत्येकी एक लाखाचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. आशियाई हॉकी फेडरेशनचे सवरेत्तम हॉकीपटू (२०११) ठरलेल्या सरदार सिंग आणि रितु रानीला प्रत्येकी दीड लाख रुपयांच्या धनादेशाने गौरवण्यात आले.
हॉटेलमध्ये हॉकीपटूंना भेटण्यास त्यांच्या एजंटना बंदी
फिक्सिंगसारखे प्रकार टाळण्यासाठी हॉकीपटू वास्तव्यास असलेले हॉटेल तसेच शिबिरात येण्यापासून फेडरशनने हॉकीपटूंच्या एजंटना बंदी घातली आहे, असे हॉकी इंडियाचे सरचिटणीस नरिंदर बात्रा यांनी सांगितले. ‘‘बीसीसीआयप्रमाणे आमची संघटना मोठी नाही. मात्र फिक्सिंग तसेच तसे प्रकार रोखण्यासाठी आम्ही सर्व ती काळजी घेत आहोत,’’ असे ते म्हणाले.