आयपीएल-१०मधील बुधवारी (१९ एप्रिल) होणा-या लढतीत गतविजेता सनरायझर्स हैदराबाद घरच्या मैदानावर दिल्ली डेअरडेव्हिल्सशी झुंजेल.
हैदराबाद- आयपीएल-१०मधील बुधवारी (१९ एप्रिल) होणा-या लढतीत गतविजेता सनरायझर्स हैदराबाद घरच्या मैदानावर दिल्ली डेअरडेव्हिल्सशी झुंजेल. किंग्ज इलेवन पंजाबला हरवून पुन्हा विजयीपथावर परतलेला यजमान सातत्य राखण्यास उत्सुक आहे. दुसरीकडे, दिल्लीला पुन्हा विजयी मार्गावर परतायचेआहे.
पाच सामन्यांतून तीन विजयासह (६ गुण) हैदराबादने गुणतालिकेत तिसरे स्थान राखले आहे. सलग दोन विजयानंतर त्यांना सलग दोन पराभव पाहावे लागले. मात्र सोमवारी चुरशीच्या लढतीत पंजाबला हरवत गतविजेत्यांनी पराभवाच्या हॅट्ट्रिकची नामुष्की टाळली. दिल्ली गुणतालिकेत चौथ्या स्थानी असून त्यांना चारपैकी दोन सामने जिंकता आलेत. मागील लढतीतील पराभवानंतर तेही विजयासाठी उत्सुक आहेत.
कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मॉईझेस हेन्रिकेसचे सातत्य तसेच मध्यमगती भुवनेश्वर कुमारचा अचूक आणि प्रभावी मारा हे हैदराबादचे बलस्थान आहे. पाच सामन्यांत वॉर्नरने दोन अर्धशतके ठोकलीत. हेन्रिकेसने चार सामन्यात तितकीच अर्धशतके मारलीत. हे दोघे परदेशी फलंदाज चांगले खेळत असले तरी डावखुरा सलामीवीर शिखर धवन, युवराज सिंग, नमन ओझा, दीपक हुडा या भारतीयांनी निराशा केली आहे.
गोलंदाज भुवनेश्वरने प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व राखले आहे. अफगाणिस्तानचा लेगस्पिनर रशिद खानने त्याला चांगली साथ दिली. मात्र अन्य गोलंदाज भरकटले आहेत. फॉर्मात असलेल्या फलंदाज आणि गोलंदाजांना अन्य सहका-यांची साथ मिळाली तर हैदराबादला सातत्य राखता येईल.
झहीर खानच्या नेतृत्वाखालील दिल्ली डेअरडेव्हिल्सची कामगिरी संमिश्र आहे. त्यांना सर्व आघाडय़ांवर खूप सुधारणा आवश्यक आहे. दिल्लीला फलंदाजीत फटकेबाज आणि अनुभवी फलंदाजांची उणीव भासतेय. शतकवीर संजू सॅमसनसह रिषभ पंत तसेच सॅम बिलिंग्जने चांगली फलंदाजी केली असली तरी अष्टपैलू कोरी अँडरसन, करुण नायर आणि श्रेयस अय्यरला अद्याप सूर गवसलेला नाही.
कर्णधार झहीरसह पॅट कमिन्स आणि ख्रिस मॉरिस या मध्यमगती त्रिकुटाने थोडा फार चांगला मारा केला असला तरी ‘मॅचविनर’ स्पिनर नाही. लेगस्पिनर अमित मिश्रा तितका प्रभावी ठरत नाही.
उभय संघांची कामगिरी पाहता सद्यस्थितीत हैदराबादचे पारडे जड वाटते. मात्र प्रतिस्पर्धी संघाला कधीही कमी लेखता येत नाही.
वेळ : रा. ८ वा. थेट प्रक्षेपण : सेट मॅक्स.