आयपीएल-९मधील गुरुवारी (१२ मे) होणा-या लढतीत सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्सची कसोटी लागेल.
हैदराबाद- आयपीएल-९मधील गुरुवारी (१२ मे) होणा-या लढतीत सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्सची कसोटी लागेल. सलग चार सामने जिंकलेल्या यजमानांना घरच्या मैदानावर विजयाचाा ‘पंचक’ लगावण्याची संधी आहे. दुसरीकडे, सलग दोन पराभवांनंतर दिल्ली विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक आहेत.
हैदराबादने १० सामन्यांतून १४ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. दिल्लीला ९ सामन्यांतून ५ सामने जिंकता (१० गुण) आलेत. ते चौथ्या स्थानी आहेत. नवव्या हंगामात प्रथमच आमनेसामने येणा-या उभय संघामध्ये हैदराबादचे पारडे जड वाटते. सर्व आघाडय़ांवरील उंचावलेली कामगिरी हे सनरायझर्सच्या विजयाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले आहे.
कर्णधार डेव्हिड वॉर्नरसह सलामीवीर शिखर धवनचा जबरदस्त फॉर्म तसेच भुवनेश्वर कुमार आणि मुस्तफिझुर रहमानचा प्रभावी मारा त्यांचे बलस्थान ठरले आहे. वॉर्नरने १० सामन्यांत ५ अर्धशतके ठोकताना यंदा सर्वाधिक धावा करणा-या अव्वल तीन फलंदाजांमध्ये स्थान राखलेय. त्याला धवनची चांगली साथ लाभलीय.
सुरुवातीच्या तीन सामन्यांत १६ धावा करणा-या शिखरने त्यानंतरच्या सात सामन्यांत तीन नाबाद अर्धशतके ठोकलीत. अन्य प्रमुख फलंदाजांचा खराब फॉर्म कायम आहे. मात्र वॉर्नर-धवनमुळे त्यांचे अपयश झाकले गेले आहे. यजमानांच्या गोलंदाजीची धुरा भुवनेश्वर कुमार आणि मुस्तफिझुर रहमानने पेलली आहे. त्यांना अनुभवी मध्यमगती गोलंदाज आशीष नेहरा आणि मॉईझेस हेन्रिकेसची चांगली साथ लाभली आहे.
अष्टपैलू युवराज सिंगला अद्याप छाप पाडता आली नसली तरी त्याच्या समावेशामुळे मधली फळी मजबूत झाली आहे. तसेच फिरकी गोलंदाजीत आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे.
दिल्लीची कामगिरी संमिश्र राहिली असली तरी मागील दोन लढतीत त्यांना पराभव पाहावा लागला. डेअरडेव्हिल्सतर्फे फलंदाज क्विंटन डी कॉक, करुण नायर, यष्टिरक्षक, फलंदाज संजू सॅमसन, कर्णधार आणि मध्यमगती गोलंदाज झहीर खान, फिरकीपटू अमित मिश्रा तसेच ख्रिस मॉरिसने छाप पाडली आहे.
सांघिक कामगिरी उंचावण्यासाठी अष्टपैलू जेपी दुमिनी आणि क्रेग ब्राथवेटसह ऋषभ पंत, सॅम बिलिंग्ज, मध्यमगती गोलंदाज मोहम्मद शामीला कामगिरी उंचावण्याची आवश्यकता आहे. अंतिम चार संघात स्थान मिळवायचे असल्यास दिल्लीला उर्वरित पाच लढतींमध्ये अधिकाधिक विजय आवश्यक आहेत. त्यामुळे हैदराबादविरुद्ध दिल्लीचा कस लागेल.
वेळ : रा. ८ वा.