दप्तरी नोंद करण्याची मागणी
मुरबाड – जंगल वाचवा सत्याग्रहामध्ये हुतात्मा झालेले क्रांतिकारी कै. नाग्या महादू कातकरी यांच्या ८८ व्या पुण्यतिथीनिमित्त नुकतेच भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच अक्कादेवीच्या डोंगरावर झालेल्या जंगल सत्याग्रहावेळी गोळीबार चालू असताना बळी पडलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ मुरबाडमध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिवाजी चौक मुरबाड ते आंबेडकर चौक, तीन हात नाका ते कुणबी समाज हॉलपर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. त्यानंतर कुणबी समाज हॉलमध्ये पुण्यतिथी, विद्यार्थी गुणगौरव आदिवासी कातकरी समाज राज्यव्यापी जनजागृती तसेच विविध कार्यक्रम घेण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी सचिव मधुकर हिल्म, काशीनाथ पाटील, पुंडलिक भोसले, पुंडलिक धुमाळ, मंगल ठाकरे, गौतम वाघ, डॉ. हेमंत सवरा, जयराम सहारे, देविदास धुमाळ, देऊ वाघ, पांडुरंग वाघ, किसान हिलम यांच्यासह इगतपुरी कमिटी अध्यक्ष पांडुरंग रंग, अनेक जिल्हा आणि तालुका अध्यक्ष, पदाधिकारी तसेच सदस्य व आदिवासी बांधव आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांची दप्तरी नोंद व्हावी व मुरबाडमध्ये स्मारक करण्याची जोरदार मागणी सर्व संघटनांनी केली आहे. तसेच नाग्या महादू कातकरी यांची पुण्यतिथी व आदिवासी मेळावा प्रथमच पार पडल्याने तालुक्यात प्रशासन खडबडून जागे झाले आहे.