कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या किंगफिशरने हिस्सा विक्रीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
मुंबई- कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या किंगफिशरने हिस्सा विक्रीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. भांडवल भरणा करण्यासाठी किंगफिशर विविध परदेशी कंपन्यांबरोबर गुंतवणुकीबाबत चर्चा करत आहे. यासाठी थेट परकीय गुंतवणुकीचा मार्ग प्रशस्त करण्याच्या दृष्टीने कंपनीने परकीय संस्थात्मक गुंतवणुकीवर तीन टक्क्यांपर्यंत मर्यादा आणली आहे.
थकलेल्या पगारासाठी कर्मचा-यांचे संप, परवाना निलंबनाची कारवाई यामुळे गेल्या काही दिवसांपासून कंपनीची विमाने जमिनीवर आहेत. नुकतीच सेवाकर वसुलीसाठी कंपनीच्या विमानावर जप्तीही आणण्यात आली. यामुळे वारंवार नामुष्कीला सामोरे जाव्या लागणा-या या कंपनीला तातडीने भांडवलाची आवश्यकता असून, यासाठी कंपनीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यामुळे कंपनीची भांडवली व्यवस्था सज्ज ठेवण्याच्या तयारीला कंपनी लागली आहे.
मुंबई शेअर बाजाराला याविषयी केलेल्या सादरीकरणात एफआयआय, क्वालिफाइड फॉरेन इन्व्हेस्टरना सध्याच्या तीन टक्के मर्यादापलीकडे गुंतवणूक करता येणार नसल्याचे किंगफिशरने म्हटले आहे.
१२ डिसेंबरला झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर निर्णय झाल्याचेही यात म्हटले आहे. तसेच या बैठकीत कंपनीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विविध पर्यायांवरही चर्चा करण्यात आल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. सप्टेंबर तिमाहीपर्यंत परकीय गुंतवणूकरांचा किंगफिशरमध्ये २.४६ टक्के हिस्सेदारी आहे. तर देशांतर्गत विमान कंपन्यांतील थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा नुकतीच ४९ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. नुकतेच एतिहाद व अन्य परदेशी विमान कंपन्यांशी हिस्सा विक्रीसाठी चर्चा सुरू असल्याचे कंपनीने म्हटले होते.