सर्वसामान्य जीवन जगत असामान्य कर्तृत्व करणा-या रणरागिणींचा हिरकणी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
मुंबई- सर्वसामान्य जीवन जगत असामान्य कर्तृत्व करणा-या रणरागिणींचा हिरकणी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मुंबई दूरदर्शन केंद्राच्या सह्याद्री वाहिनीच्या वतीने दिला जाणारा ‘हिरकणी सन्मान पुरस्कार २०१६’ सोहळा बुधवारी वरळीतील दूरदर्शन केंद्रात सायंकाळी पार पडला.
देशासमोर न आलेल्या महिला या पुरस्काराच्या निमित्ताने सर्वासमोर येतात. त्यांचे कर्तृत्व येते. यामुळे तरुण पिढीला, या क्षेत्रात येऊ इच्छिणा-या महिलांना प्रेरणा मिळते, यामुळे असे सोहळे वर्षातून दोनदा ठेवून अधिकाधिक महिलांचा सन्मान करावा, अशा भावना आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी या वेळी व्यक्त केल्या.
मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा, आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर, अभिनेत्री स्मिता जयकर, अभिनेते भरत दाभोळकर आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. पुरस्कार निवड समितीमध्ये मीरा बोरवणकर (आय.पी.एस), अॅड. जाई वैद्य, अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, पत्रकार दिलीप चावरे, पत्रकार संजय आवटे यांचा समावेश होता. या वेळी आठ महिलांचा गौरव करण्यात आला.
अशिक्षित असूनही शिकण्याची जिद्द निर्माण करणा-या सुमन मोरे या महिलेने कच-यातून जीवनाचे सोने केले. बालपणीच लग्न झालेल्या सुमननी संसाराला हातभार म्हणून कचरा वेचत या कार्याला भव्य स्वरूप दिले. पुण्यातील सुमन यांच्या या कार्याची दखल महानगरपालिकेसह परदेशातही घेतली गेली. पर्यावरणाचा समतोल राखण्यात उषा मडावी या जंगल संरक्षकाचे योगदान आहे.
आदिवासीपाडय़ात राहणा-या उषा यांनी एकटय़ाने पुढाकार घेत अवैध जंगलतोड थांबवली. ‘आय अॅम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड’ असा नारा लगावत महाराष्ट्रातील दुस-या एव्हरेस्ट शिखर सर करणा-या प्रियांका मोहिते या गिर्यारोहकाचा या वेळी गौरव करण्यात आला. रग्बीसारख्या हटके खेळाला महत्त्व देत करिअरच्या दृष्टिकोनातून भारतात याला उत्तम संधी निर्माण करून द्यायची आहे, असे मत पुरस्कारप्राप्त रग्बी खेळाडू वाहबीझ बरूचा यांनी व्यक्त केले.
‘राईट टू पी’ या चळवळीने प्रत्येक व्यक्तीला तिचा मूलभूत हक्क देणा-या सामाजिक कार्यकर्त्यां मुमताज शेख, तर शास्त्रीय नृत्याला आगळी ओळख देऊन नवोदित नर्तकांना प्रशिक्षण देणा-या शास्त्रीय नृत्यांगना संध्या पुरेचा यांना पुरस्कार देण्यात आला.
आय.ए.एस. अधिकारी डॉ. माधवी खोडे आणि पोलीस निरीक्षक शबाना शेख यांनी पुरुषांच्या बरोबरीने आदर्श निर्माण करून देत या क्षेत्रातही महिलांना मानाचे स्थान दिल्याबद्दल त्यांचा सत्कार केला गेला. या सोहळ्याचे प्रसारण सह्याद्री वाहिनीवरून शनिवार ३० एप्रिल रोजी दु. ४.३० ते ६.५५ या वेळेत होईल.