सलमान खानला वाहन परवाना सादर करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत सत्र न्यायालयाने मंगळवारी सलमानला २००२ सालच्या हिट अँण्ड रन प्रकरणात दिलासा दिला आहे.
मुंबई – सलमान खानला वाहन परवाना सादर करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत सत्र न्यायालयाने मंगळवारी सलमानला २००२ सालच्या हिट अँण्ड रन प्रकरणात दिलासा दिला आहे.
अपघाताच्यावेळी सलमानकडे वाहन परवाना नव्हता हा आरोप सिध्द करण्यासाठी फिर्यादी पक्षाने सलमानने वाहन परवाना सादर करावा अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. मंगळवारच्या सुनावणीत सत्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.
२८ सप्टेंबर २००२ च्या रात्री सलमानने बांद्रयामध्ये आपल्या घराजवळ भरधाव वेगात गाडी चालवत पदपथावर झोपलेल्या पाच जणांना आपल्या गाडीखाली चिरडले होते. यात एका नागरीकाचा मृत्यू झाला. चौघेजण गंभीर जखमी झाले होते.
ही घटना घडली त्यावेळी सलमानकडे वाहन परवाना नव्हता असा युक्तीवाद सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी केला. प्रादेशिक वाहन कार्यालयातील नोंदीनुसार सलमानला २००४ सालामध्ये वाहन परवाना मिळाला.
सलमानचे वकिल श्रीकांत शिवदे यांनी फिर्यादी पक्षाच्या याचिकेला विरोध केला. फिर्यादी पक्षाने सलमानच्या वाहन परवान्याची मागणी न करता आपला मुद्दा सिध्द करुन दाखवावा असा युक्तीवाद त्यांनी केला. या टप्प्याला याचिका दाखल करुन घेता येणार नाही असे स्पष्ट करीत न्यायालयाने सलमानच्या वाहन परवान्याची मागणी करणारी याचिका फेटाळली. घटनेच्यावेळी गाडी चालवण्याचा आरोप सलमानने फेटाळून लावला आहे.