कर्नाटकातील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येचे बजरंग दलाने संतापजनक पद्धतीने समर्थन केले आहे.
बंगळूरु- कर्नाटकातील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येचे बजरंग दलाने संतापजनक पद्धतीने समर्थन केले आहे. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर काही तासांतच बजरंग दलाच्या भूवित शेट्टी या कार्यकर्त्यांने ट्विटरवर ‘हिंदुत्वाला विरोध करा आणि कुत्र्याचे मरण पत्करा,’ असे वादग्रस्त ट्विट केले.
त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या ट्विटमुळे कर्नाटकात संतापाची लाट उसळली होती. कलबुर्गी यांच्या हत्येमागे हिंदुत्ववादी संघटनांचाच हात असण्याचा संशय बळावला आहे.
कर्नाटकातील बजरंग दलाचे कार्यकर्ते भूवित शेट्टी यांनी हे ट्विट केले असून ट्विटरवरून कलबुर्गी यांच्या हत्येचे समर्थन करताना शेट्टी यांनी ‘हिंदुत्वाला विरोध करा आणि कुत्र्याचे मरण पत्करा! आधी यू. आर. अनंतमूर्ती, आता एम. एम. कलबुर्गी आणि नंतर के. एस. भगवान यांचा नंबर आहे’, असे म्हटले आहे.
कलबुर्गी यांच्या हत्येनंतर बजरंग दलाला असुरी आनंद झाल्याचे पाहायला मिळत असून त्यातूनच हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. या प्रकारानंतर कलबुर्गी यांच्या हत्येचे समर्थन आणि के. एस. भगवान यांना धमकी दिल्याप्रकरणी भूवित शेट्टी यांच्याविरोधात कर्नाटकात तक्रार दाखल करण्यात आली होती.
डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची रविवारी सकाळी कर्नाटकातील धारवाड येथे त्यांच्या राहत्या घरी अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. कलबुर्गी हे आपल्या वक्तव्यांनी वादात राहिले होते. त्यामुळे त्यांना अनेकदा जिवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या होत्या. याआधी मागील वर्षी जून महिन्यात एका गटाने रात्रीच्या सुमारास त्यांच्या घरावर हल्ला केला होता. मात्र त्यातून ते सुदैवाने बचावले होते.