पावसाळ्यात साचणा-या पाण्याचा निचरा करण्यासाठी मुंबईतील नाल्यांचे रुंदीकरण व पंपिंग स्टेशनची कामे हाती घेतल्यानंतरही हिंदमातासह दक्षिण मुंबईतील काही भागांत पाणी तुंबतेच. हिंदमातासह अनेक ठिकाणी साचणा-या पाण्याची समस्या दोन वर्षापूर्वीच दूर होणे आवश्यक होते.
मुंबई – पावसाळ्यात साचणा-या पाण्याचा निचरा करण्यासाठी मुंबईतील नाल्यांचे रुंदीकरण व पंपिंग स्टेशनची कामे हाती घेतल्यानंतरही हिंदमातासह दक्षिण मुंबईतील काही भागांत पाणी तुंबतेच. हिंदमातासह अनेक ठिकाणी साचणा-या पाण्याची समस्या दोन वर्षापूर्वीच दूर होणे आवश्यक होते. मात्र यासाठी बांधण्यात येणा-या ब्रिटानिया पंपिंग स्टेशनच्या कामालाच विलंब झाल्यामुळे मुंबईकरांना आजही पावसाळ्यात हिंदमाता परिसरातून गुडघाभर पाण्यातून मार्ग काढावा लागतो. पण तब्बल सात वर्षानी या कामासाठी मुहूर्त सापडला असून, येत्या महिनाभरात कामाला सुरुवात होईल. त्यामुळे आणखी तीन पावसाळे तरी मुंबईकरांची हिंदमाताजवळ तुंबणा-या पाण्यापासून सुटका नाही.
२६ जुलैच्या महापुरानंतर मुंबई महापालिकेने मिठी नदीचा विकास तसेच ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत नाल्यांच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले. याबरोबरच सखल भागांमध्ये साचणा-या पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपिंग स्टेशनची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हाजीअली, इर्ला पंपिंग स्टेशनची कामे पूर्ण झाली आहेत. तर लव्हग्रोव्ह आणि क्लिव्हलँड बंदर येथील पंपिंग स्टेशनचे काम सुरू आहे. मात्र ब्रिटानिया, गझदरबंद, मोगरा आणि माहूल येथील पंपिंग स्टेशनचे काम रखडले आहे. ब्रिटानिया आउटफॉल येथील पंपिंग स्टेशनच्या बांधकामासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीची जागा सहा महिन्यांपूर्वीच महापालिकेच्या ताब्यात मिळाली आहे. पंपिंग स्टेशनसाठी कायमस्वरूपी २,२०० चौरस मीटरची जागा ३० वर्षाकरता महापालिकेला भाडेकरारावर देण्यात आली असून, या पंपिंगच्या कामासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने २,५०० चौरस मीटरची अतिरिक्त जागा दोन वर्षे वापरण्यासाठी दिली आहे.
ही जागा ताब्यात आल्यानंतर ब्रिटानिया पातमुखाजवळ पंपिंग स्टेशन बनवण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यातून युनिटी कन्स्ट्रक्शन कंपनीला काम मिळाले. या कंपनीने १०६ कोटी रुपयांत हे काम मिळवले आहे. प्रशासनाचा अंदाजित खर्च ११६ कोटी रुपयांचा होता. हे काम मिळवण्यासाठी प्रतिभा अँड प्रतिभा कंपनीनेही निविदा भरली होती. परंतु त्या दोन्ही भागीदार कंपन्या अपात्र ठरल्या. याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीपुढे मांडण्यात येत असल्याची माहिती पर्जन्यजल विभागाचे प्रमुख अभियंता लक्ष्मण व्हटकर यांनी दिली.
गझदरबंद पंपिंग स्टेशनचीही निविदा
गझदरबंद पंपिंग स्टेशनच्या कामासाठी निविदा मागवण्यात आली असून, १३४ कोटी रुपयांच्या या कामासाठी एल अँड टी, स्काय वे आणि प्रतिभा आणि प्रतिभा या कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. या निविदेचे शेवटचे पाकीट फोडल्यानंतर या तीन कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड केली जाणार आहे.