दिल्लीतील ३६ विविध गुन्ह्यांत पोलिसांना हवा असलेल्या संदीप गडोली या गुडगावमधील कुख्यात गुंडाला हरियाणा पोलिसांनी मुंबईच्या अंधेरी परिसरातील एका हॉटेलमध्ये टिपला.
मुंबई – दिल्लीतील ३६ विविध गुन्ह्यांत पोलिसांना हवा असलेल्या संदीप गडोली या गुडगावमधील कुख्यात गुंडाला हरियाणा पोलिसांनी मुंबईच्या अंधेरी परिसरातील एका हॉटेलमध्ये टिपला. पोलीस आणि गडोली यांच्यात रविवारी सकाळी बराच काळ सुरू असलेल्या चकमकीत तो ठार झाला आहे.
पोलिसांच्या यादीवर ‘वाँटेड’ असलेल्या गडोलीवर १.२५ लाखांचे इनामही ठेवण्यात आले होते. या चकमकीत एक पोलीसही जखमी झाल्याचे वृत्त आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता अंधेरी मुंबई येथे ‘एअरपोर्ट मेट्रो’ हॉटेलमध्ये ही चकमक उडाली.
गुडगाव गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केल्याचे मुंबई पोलिसांतर्फे सांगण्यात आले. गडोली हा अंधेरीतील एका हॉटेलात निवास करून असल्याची खबर गुडगाव पोलिसांना लागली होती. त्यानुसार त्यांनी सापळा लावून ही कारवाई केली.
यावेळी गडोलीने प्रत्युत्तरादाखल पोलिसांवर गोळीबार केला. यात गडोलीला गोळी लागल्याने जबर जखमी अवस्थेत त्याला नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले.मात्र उपचाराआधीच त्याला मृत घोषित करण्यात आले.