भारताची ग्रॅँडमास्टर कोनेरू हम्पीला शनिवारी ताश्कंद ग्रॉँप्री बुद्धिबळ स्पर्धेच्या नवव्या फेरीत पराभवाचा धक्का बसला.
ताश्कंद (उझबेकिस्तान)- भारताची ग्रॅँडमास्टर कोनेरू हम्पीला शनिवारी ताश्कंद ग्रॉँप्री बुद्धिबळ स्पर्धेच्या नवव्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. अव्वल स्थानी असलेली हम्पी यंदा जेतेपदासाठी दावेदार मानली जात असतानाच जॉर्जियाच्या बेला खोटेनश्विलीविरुद्ध तिला स्पर्धेतील पहिला पराभव पाहावा लागला.
काळी मोहरी घेऊन खेळताना हम्पीने ६०व्या चालीला पराभव मान्य केला. ४२व्या चालीला राजाला हलवण्याची चूक तिच्या पराभवाचे कारण ठरले. तेव्हापासून हम्पीला सतत राजाला वाचवावे लागत होते.
लढतीचा वेळ वाढवण्याचा तिने प्रयत्न केला असला तरी शेवटी पराभव मान्य करण्यावाचून तिच्यासमोर पर्याय उरला नाही. भारताच्या हरिका द्रोणावल्लीलाही नवव्या फेरीत रशियाच्या अलेक्झांड्रा कोस्टेनिककडून पराभव स्वीकारावा लागला. पांढरी मोहरी घेऊन खेळताना हरिकाने ४७व्या चालीत पराभव मान्य केला. दुस-या स्थानी असलेल्या हरिकाचा स्पर्धेतील पहिलाच पराभव ठरला आहे.