पंचकुला – हिंसाचाराच्या घटनेनंतर तब्बल ३८ दिवस पोलिसांना चकवा देणा-या हनीप्रीतला अखेर बेडय़ा ठोकण्यात आल्या आहेत. बाबा राम रहिमची दत्तक कन्या असलेल्या हनीप्रीतची कोठडीत कसून चौकशी करण्यात आली. ३८ दिवस ती कुठे होती, अशी विचारणा पोलिसांनी तिच्याकडे केली.
हनीप्रीत नेपाळमध्ये पळून गेल्याची चर्चा होती. पण नेपाळला गेले नाही, असा दावा हनीप्रीतने चौकशीदरम्यान केला. पंजाबमधील भटिंडा येथील ‘डेरा’ समर्थकाच्या घरात लपून बसले होते, असे तिने पोलिसांना सांगितले. पण पोलिसांना तिच्याकडून आणखी माहिती मिळू शकलेली नाही. ती भटिंडामध्ये लपून बसल्याची माहिती एका महिलेने पोलिसांना दिली होती. संबंधित महिला डेरा अनुयायी असून तिचे कुटुंब ‘डेरा’मध्ये राहत होते. भटिंडा येथे त्यांच्या मालकीचे घर आणि जमीन आहे. हनीप्रीत २ सप्टेंबरपासून त्या घरात राहत होती, अशी माहिती आता समोर आली आहे.
पंचकुलातील चंडीमंदिर पोलीस ठाण्यात तब्बल पाच तास तिची चौकशी करण्यात आली. सुरुवातीला चौकशीदरम्यान हनीप्रीतकडून माहिती मिळू शकली नव्हती. तिची चौकशी सुरूच राहील, असे पोलिसांनी सांगितले होते.