सिंधुरत्न फाउंडेशनच्या वतीने कणकवली येथे १ ते ३ मे या कालावधीत स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.
कणकवली- सिंधुरत्न फाउंडेशनच्या वतीने कणकवली येथे १ ते ३ मे या कालावधीत स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. वार्षिक वासंतिक व्याख्यानमालेचे हे दुसरे वर्ष असून उद्घाटन १ मे रोजी सायंकाळी ६ वा. उद्योगमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे.
व्याख्यानमालेत अर्थतज्ज्ञ व केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव, अर्थतज्ज्ञ जयराज साळगावकर व सुप्रसिद्ध कवी रामदास फुटाणे हे संवाद साधणार आहेत. या व्याख्यानमालेचा समारोप ३ मे रोजी सायंकाळी ७.३० वा. होणार असून ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे उपस्थित राहणार आहेत.
नवनवीन विचारप्रवाह समाजापर्यंत पोहोचावेत, वैचारिक आंदोलने व्हावीत यासाठी कणकवलीच्या सांस्कृतिक, वैचारिक परंपरेला साजेसी अशी व्याख्यानमाला पालकमंत्री नारायण राणे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आली आहे. १ मे रोजी सायं. ६ वा. होणा-या उद्घाटन कार्यक्रमास खा. डॉ. निलेश राणे उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन कार्यक्रमानंतर केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य, अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांचे ‘भारत एक आर्थिक महासत्ता स्वप्न की सत्य?’या विषयावर व्याख्यान होणार आहे. २ मे रोजी वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांचे ‘वात्रटिकेतील वास्तव्य’ विषयावर व्याख्यान होणार आहे. तर ३ मे रोजी कालनिर्णय दिनदर्शिकेचे व्यवस्थापक व अर्थतज्ज्ञ जयराज साळगावकर यांचे ‘जागतिकीकरण आणि कोकणच्या संधी’ विषयावर व्याख्यान होणार आहे. व्याख्यानमालेमध्ये प्रमुख वक्त्यांच्या मार्गदर्शनाबरोबर शंकानिरसन, संवाद व चर्चासत्रही होणार आहे.
व्याख्यानमालेचा समारोप ३ मे रोजी सायंकाळी ७.३० वा. पालकमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. खा. डॉ. निलेश राणे, युवा नेते नितेश राणे तसेच विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत, असे सिंधुरत्न फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण राणे जिल्हा दौ-यावर आले आहेत. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे, १ मे रोजी होणा-या महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५३ व्या वर्धापनदिनानिमित्त सकाळी ८ वा. राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभास सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय ओरोस येथे उपस्थिती. ९.३० वा. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील सामान्य विभागात आयोजित केलेल्या जीवन अमृत योजनेचा प्रारंभ. रक्तपेढी विभाग, किडनी डायलेसीस युनिट लोकार्पण सोहळा. नवजात अर्भक अतिदक्षता उपचार विभागाच्या उद्घाटन सोहळय़ास उपस्थिती. सायंकाळी ६ वा. दै. प्रहारच्या नूतन वास्तू सभागृह कणकवली येथे स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेस उद्घाटक म्हणून उपस्थिती. २ मे रोजी जिल्ह्यातील स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती. ३ मे रोजी जिल्ह्यातील स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती.