स्वाइन फ्लू या आजाराने भंडारा जिल्ह्यातही शिरकाव केला असून, तुमसर येथे तिघांचा मृत्यू झाल्याने शहरासह ग्रामीण भागातही घबराट पसरली आहे.
भंडारा – स्वाइन फ्लू या आजाराने भंडारा जिल्ह्यातही शिरकाव केला असून, तुमसर येथे तिघांचा मृत्यू झाल्याने शहरासह ग्रामीण भागातही घबराट पसरली आहे. आजाराचे निदान करणाऱ्या सुपर रेलिगेअर सोसायटी, गोरेगाव, मुंबई आणि एन. व्ही. आय., पुणे या आरोग्यविषयक संस्थांनीही रुग्णांचा मृत्यू स्वाइन फ्लूने झाल्याचा अहवाल दिला आहे.
तुमसर येथील साई कॉलनीत राहणारी मनीषा राजकुमार तितीरमारे (३१) या गर्भवती महिलेला ताप आल्याने तसेच सतत खोकला आणि अन्य प्रकारची लक्षणे दिसून आल्याने १३ सप्टेंबर रोजी तुमसर येथील भुरे नर्सिग होममध्ये दाखल करण्यात आले. १६ सप्टेंबर रोजी शस्त्रक्रियेने तिची प्रसूती करण्यात आली. दुस-याच दिवशी मनीषा आणि तिच्या नवजात बालिकेची प्रकृती अधिकच बिघडल्याने दोघींनाही नागपूर येथे नेले जात असताना, नवजात बालिका वाटेतच दगावली. तर नागपूरच्या केअर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या मनीषाचा २२ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला.
मनीषा आणि तिच्या नवजात मुलीच्या रक्ताचे नमुने तपासणीकरिता मुंबई आणि पुणे येथे पाठवण्यात आले होते. या संस्थांचा अहवाल आला असून, त्या दोघींना स्वाइन फ्लूची लागण झाली होती, असे या संस्थांनी कळवले आहे. तुमसरच्याच बडा बाजार भागातील एका ४० वर्षीय व्यक्तीचाही स्वाइन फ्लूने दगावल्याची माहिती आहे.