बहारदार सेहवागच्या नावावर कसोटीत दोन त्रिशतके, चार द्विशतके तसेच वनडेत (एका द्विशतकासह) १५ शतके आहेत. मात्र शतकांसाठी तो कधीही खेळला नाही.
मुंबई- बहारदार सेहवागच्या नावावर कसोटीत दोन त्रिशतके, चार द्विशतके तसेच वनडेत (एका द्विशतकासह) १५ शतके आहेत. मात्र शतकांसाठी तो कधीही खेळला नाही. शतकाच्या जवळ आल्यानंतर भले-भले फलंदाज खेळपट्टीला चिकटून राहतात. मात्र सेहवागने संघहिताला अधिक महत्त्व दिले. सहा वर्षापूर्वी मुंबईत झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या तिस-या कसोटीत तसा अनुभव आला.
डिसेंबर २००९मध्ये क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (मुंबई) ब्रेबर्न स्टेडियमवरील तिस-या कसोटीत दुस-या दिवसअखेर (गुरुवारी) सेहवाग २८४ धावांवर खेळत होता. त्याचे त्रिशतक ‘याचि देही, याचि डोळा’ पाहण्यासाठी तिकीट मिळावे म्हणून दुस-या दिवशी (शुक्रवारी) चर्चगेट स्टेशनपर्यंत रांगा लागल्या. मात्र शतकासाठी खेळेल, तो सेहवाग कसला? प्रेक्षक तिकीट घेऊन स्टेडियममध्ये बसण्यापूर्वीच तो २९३ धावांवर बाद झाला. १५ चेंडू आणि जेमतेम तितकीच मिनिटे सेहवाग टिकला. त्रिशतक हुकल्याचे त्याला जरूर वाईट वाटले. मात्र पश्चाताप वैगेरे काही नाही. श्रीलंकेविरुद्ध त्रिशतक पूर्ण झाले असते तर तिसरे त्रिशतक त्याच्या नावावर झाले असते.
सेहवागचे एक त्रिशतक हुकले आहे. चार द्विशतके असली तरी कसोटीत किमान आणखी दोन द्विशतकांची भर त्याला घालता आली असती. २००३मध्ये मेलबर्न कसोटीत सेहवाग १९५ धावांवर ‘आउट’ झाला. वेस्ट इंडिजविरुद्ध (२००६) ग्रोस आयलेट कसोटीत तो १८० धावांवर बाद झाला. सहा वेळा सेहवागने दीडशेहून अधिक धावा केल्यात. कसोटीत सेहवागच्या नावावर २३ शतके आहेत. त्याने शतकांना प्राधान्य दिले असते तर कदाचित शतकांची संख्या २८वर गेली असती. एक-दोन नव्हे तर तब्बल पाच वेळा वीरू नव्वदीत बाद झालाय.
कसोटीमध्ये तेच वनडेतही. वनडेत १५ शतके लगावणा-या सेहवागने द्विशतक ठोकण्याचाही मान मिळवला आहे. मात्र आणखी सहा शतके त्याला शक्य होती. या सहाही खेपेस तो ‘नव्र्हस नाइंटीज्’चा बळी ठरला. २०१०मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या तिस-या वनडेत (डांबुला) ९९ धावांवर असताना प्रतिस्पध्र्यानी रडीचा डाव खेळला. ३५व्या षटकात सूरज रणदीवने ‘वाईड’ चेंडू टाकला. तेव्हा सेहवागसह यष्टिरक्षकही चकला आणि चार ‘बाईज’ धावा मिळाल्या. पुढील दोन चेंडू सेहवागने खेळून काढले. चौथा चेंडू रणदीवने ‘नोबॉल’ टाकला. भारत जिंकला, मात्र वीरू शतकापासून वंचित राहिला. शतक हुक(व)ल्याचे दु:ख नसल्याचे तो म्हणाला. ‘‘एखादा फलंदाज ९९ धावांवर खेळत असताना प्रतिस्पर्धी गोलंदाज ‘वाईड’ किंवा ‘नोबॉल’ टाकतो. क्रिकेटमध्ये असे सर्रास पाहायला मिळते,’’ असे सेहवागने म्हटले होते.