स्वचारित्र्याची जपणूक आणि गोपनीयता बाळगणे ही महिलेची जबाबदारी असल्याचे हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
शिमला- स्वचारित्र्याची, प्रतिष्ठेची जपणूक करणे आणि गोपनीयता बाळगणे ही महिलेची जबाबदारी आहे. शारीरिक संबंध प्रस्थापित करताना महिलेची पिळवणूक आणि छळ केला जावू नये, ही पुरुषांची नैतिक जबाबदारी असली तरी शारीरिक संबंध ठेवताना ते कोणासोबत ठेवावे, हे त्या महिलेनेच ठरवायला हवे, असे स्पष्ट मत हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
शारिरीक संबंध ठेवताना सर्व गोष्टींचा विचार करूनच महिलेने पुढील पावले उचलावीत, असे मत हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती तरलोक सिंग यांनी व्यक्त केले आहे. बलात्काराच्या एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे मत मांडले.
आरोपी बलदेव राज याच्यावर बलात्काराचा आरोप असून हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयात त्याने जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायमुर्ती तरलोक सिंग यांनी हे मत व्यक्त केले.
पुरुषाने दिलेल्या आश्वासनांना आणि थापांना महिलेने बळी न पडता शारिरीक संबंध ठेवताना सर्व गोष्टींचा विचार करूनच महिलेने पुढील निर्णय घ्यायला हवे, असे ते म्हणाले. तसेच या प्रकरणातील आरोपी आणि पीडिता हे एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखतात. आरोपी विवाहीत असल्याचे माहित असूनही पीडितेने त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तिने त्याला रोखायला हवे होते, असे ते म्हणाले.