स्पेक्ट्रम लिलावाला मुदतवाढ मिळाल्यानंतर दूरसंपर्क खाते (डॉट)ने लिलावासंदर्भातील माहिती पत्रक जाहीर केले आहे.
नवी दिल्ली- स्पेक्ट्रम लिलावाला मुदतवाढ मिळाल्यानंतर दूरसंपर्क खाते (डॉट)ने लिलावासंदर्भातील माहिती पत्रक जाहीर केले आहे. 12 नोव्हेंबरपासून लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे डॉटने म्हटले आहे. लिलावाची प्रक्रिया 40 दिवसांत पूर्ण करावी लागणार आहे.
डॉटच्या माहिती पत्रकानुसार, टू-जी स्पेक्ट्रमच्या 1800 मेगाहर्ट्झच्या लहरींचा लिलाव होणार आहे. यासाठी 28 सप्टेंबरपासून या स्पेक्ट्रमसाठी अर्ज मागवण्यात येणार आहे. लिलावात सहभागी होणा-या कंपन्यांना 19 ऑक्टोबपर्यंत आपले अर्ज सादर करता येणार आहेत. 1800 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमच्या लिलावानंतर 800 मेगाहर्ट्झसाठीही लगेच सुरुवात करण्यात येणार असल्याचे डॉटने म्हटले आहे. 22 सर्कलमध्ये प्रत्येक 1.25 मेगाहर्ट्झच्या किमान आठ ब्लॉकसाठी लिलाव होणार आहे.
नवीन दूरसंपर्क कंपनीला देशात व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान चार ब्लॉकचा लिलाव जिंकणे आवश्यक आहे. डॉटच्या माहितीपत्रकानुसार 1800 मेगाहर्ट्झच्या स्पेक्ट्रमध्ये नवीन कंपनी किमान पाच ब्लॉकचा लिलाव जिंकू शकते. तर 800 मेगाहर्ट्झसाठी किमान तीन ब्लॉकसाठी बोली लावली जाऊ शकते. मात्र ज्यांच्याकडे आधीचा स्पेक्ट्रमचा परवाना आहे अशा कंपन्या 1800 मेगाहर्ट्झसाठी किमान दोन ब्लॉक आणि 800 मेगाहर्ट्झसाठी किमान एक ब्लॉकसाठी बोली लावू शकतात.
दिल्ली सर्वात महागडे सर्कल
लिलावाला मुदतवाढ मिळाल्यानंतर दूरसंपर्क खात्याने (डॉटने) सर्कलनुसार स्पेक्ट्रमच्या राखीव किमती जाहीर केल्या आहेत. यामध्ये दिल्ली सर्कलसाठी 1.25 मेगहर्ट्झ स्पेक्ट्रमसाठी 693.06 कोटींची किमती राखीव ठेवण्यात आली आहे. तर त्याखालोखाल मुंबईसाठी प्रत्येक 1.25 मेगाहर्ट्झसाठी 678.45 कोटींची किमत राखीव ठेवण्यात आली आहे. तर जम्मू-काश्मीरमधील लिलावासाठी सर्वात कमी म्हणजेच 6.33 कोटी निश्चित करण्यात आले आहेत. या लिलावासाठी दिल्ली सर्कल सर्वात महागडे ठरले आहे.