येत्या ५ ते १० वर्षात जपानी टेलिकॉम आणि इंटरनेट कंपनी ‘सॉफ्टबॅँक’ भारतात १० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक रक्कम गुंतवणूक करणार आहे, अशी घोषणा कंपनीने केली.
टोकियो- येत्या ५ ते १० वर्षात जपानी टेलिकॉम आणि इंटरनेट कंपनी ‘सॉफ्टबॅँक’ भारतात १० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक रक्कम गुंतवणूक करणार आहे, अशी घोषणा कंपनीने केली.
भारतातील सौरऊर्जेच्या प्रकल्पांमध्ये सॉफ्टबॅँक ३५० दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक करणार आहे. भारतात आम्ही यापूर्वी २ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. आम्हाला आणखी गुंतवणूक करायची आहे, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मासायोशी सोन यांनी सांगितले.
भारताला मोठे भविष्य आहे. आम्ही इंटरनेट कंपनी व सौर ऊर्जा प्रकल्पात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देणार आहोत. आम्ही भारतात गुंतवणूक करण्यास अधिक कटिबद्ध आहोत, असे ते म्हणाले.
आम्ही देशातील सौर ऊर्जा प्रकल्पांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. पहिल्या टप्प्यात आम्ही ३५० दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक करणार आहोत. येत्या पाच ते दहा वर्षात आम्ही १० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक रक्कमेची गुंतवणूक करणार आहोत, असे ते म्हणाले.
सॉफ्टबॅँकेने गेल्या दोन वर्षात ‘स्नॅपडिल’मध्ये ६२७ दशलक्ष डॉलर्स तर ‘ओला कॅब’मध्ये २१० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. तर ‘इनमोबी’ या कंपनीत २०० दशलक्ष डॉलर्स गुंतवले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. सॉफ्टबॅँकेने भारती समूहाशी संयुक्त करार केला आहे. तसेच ‘हौसिंग.कॉम’, ‘ओयो रूम्स’ आणि ‘ग्रोफर्स’मध्ये गुंतवणूक केली.