सेरेना विल्यम्सने शनिवारी मारिया शारापोवाला सरळ दोन सेटमध्ये नमवून ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद पटकावले.
मेलबर्न – अव्वल सीडेड अमेरिकेची सेरेना विल्यम्सने यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅमवर नाव कोरले. शनिवारी झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत तिने दुस-या सीडेड रशियाच्या मारिया शारापोवावर ६-३, ७-६(७/५) असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला.
कारकीर्दीत २३व्या ग्रँडस्लॅम ‘फायनल’मध्ये खेळताना रविवारी सेरेनाने १८ बिनतोड सव्र्हिस करताना प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व राखले. शारापोवाची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्याच सेटमध्ये दुहेरी चुका (डबल फॉल्ट) केल्याचा फायदा सेरेनाने उठवला. याच सेटमध्ये ३-२ असे आघाडीवर असताना पावसाची मोठी सर आली.
१३ मिनिटांनंतर पुन्हा खेळ सुरू झाला. त्यावेळी पुन्हा एकदा ‘डबल फॉल्ट’ची चूक शारापोवाला महागात पडली. सेरेनाने ४७ मिनिटांत पहिला सेट ६-३ असा जिंकला. ‘टायब्रेकर’वर गेलेला दुसरा सेट ६४ मिनिटे चालला. मात्र मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत सेरेनाने दुस-या सेटसह ऑस्ट्रेलियन ओपनच्या सहाव्या जेतेपदाला गवसणी घातली.
१९वे ग्रँडस्लॅम
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये बाजी मारणा-या ३३ वर्षीय सेरेनाने एकूण ग्रँडस्लॅम जेतेपदांची संख्या १९वर पोहोचवली. तिने मार्टिना नवरातिलोवा आणि ख्रिस इव्हर्ट यांना मागे टाकताना सर्वाधिक जेतेपद मिळवणा-या महिला टेनिसपटूंमध्ये तिस-या स्थानी झेप घेतली. सेरेनाला आता जर्मनीची स्टेफी ग्राफ (२२ जेतेपदे) आणि ऑस्ट्रेलियाची मार्गारेट कोर्टचा (२४ जेतेपदे) विक्रम खुणावतोय. ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी ती सर्वात वयस्कर महिला टेनिसपटू ठरली.
जोकोविचची गाठ मरेशी
रविवारी (१ फेब्रुवारी) होणा-या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत अव्वल सीडेड सर्बियाचा नोवाक जोकोविचसमोर सहावा सीडेड ब्रिटनचा अँडी मरेचे आव्हान आहे. दोघेही यापूर्वी २०१३ मध्ये भिडले होते. त्यात जोकोविच सरस ठरला. जोकोविचला पाचव्या ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपदाची संधी आहे. यापूर्वी चार जेतेपदे मिळवताना त्याने २०११, २०१२ आणि २०१३ अशी हॅट्ट्रिक साधलीय. मात्र गेल्या वर्षी उपांत्यपूर्व फेरीतच त्याचे आव्हान संपुष्टात आले. मरेला पहिल्यावहिल्या ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपदाची प्रतीक्षा आहे. यापूर्वी नऊ वेळा सहभागी होताना त्याने २०१०, २०११ आणि २०१३ मध्ये अंतिम फेरी गाठली होती. मात्र मरेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.