केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यानी सोमवारी लोकसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पाने शेअर बाजाराची घोर निराशा केली.
मुंबई- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यानी सोमवारी लोकसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पाने शेअर बाजाराची घोर निराशा केली. बाजार निर्देशांक म्हणजे सेन्सेक्स जेटली यांचे भाषण सुरु असताना तब्बल ६०० अंकांनी कोसळला होता.
जेटली यांनी जाहीर केलेल्या विविध करप्रस्तावांमुळे निर्देशांकाने २२,४९४ ची नीचांकी पातळी गाठली होती. नंतर मात्र तो काहीसा सावरला आणि अखेर १५२ अंकांनी घसरुन २३,००२ वर बंद झाला. निफ्टी निर्देशांकानेही सात हजाराच्या खालची पातळी गाठली होती.
अर्थसंकल्पामुळे शेअर बाजारात निराशेचे वातावरण पसरले होते. पेट्रोल मोटरींवर एक टक्का सेस तर डिझेल मोटरींवर अडीच टक्के अधिभार लावण्याच्या घोषणेमुळे तसेच दहा लाखांहून अधिक किमतीच्या गाडय़ा महाग होणार असल्याने वाहन क्षेत्राला फटका बसला. त्यांचा निर्देशांक कोसळला.
मारुती सुझुकीसह वाहन कंपन्यांचे समभाग चांगलेच कोसळले. बाजार निर्देशांकाने दिवसभराच्या सत्रात जवळपास ६०० अंकांची गटांगळी खाल्ली. त्यानंतर मात्र रिझव्र्ह बँकेने व्याजदरात कपात करण्याचे संकेत दिल्याने बाजारात पुन्हा काहीसा उत्साह संचारला.
पेट्रोल आणि डिझेल वाहनांवर अधिभार लावण्याच्या जेटली यांच्या प्रस्तावामुळे वाहन कंपन्यांच्या समभागांची विक्रीचा दबाव प्रचंड वाढला. या कंपन्यांचे समभाग ४.८८ टक्क्य़ांनी कोसळले. विविध सिग्रेट आणि तंबाखूजन्य पदार्थावर कर वाढवल्याने सिग्रेट कंपन्यांचे समभागही कोसळले.