सकारात्मक जागतिक संकेत आणि रिझव्र्ह बँकेडून व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्याच्या अपेक्षेने गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीने बाजाराला पुन्हा ‘अच्छे दिन’ आले.
मुंबई- गेल्या आठवडयात गमावलेल्या ४७६ अंकांची भरपाई बाजाराने सोमवारी केली. सकारात्मक जागतिक संकेत आणि रिझव्र्ह बँकेडून व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्याच्या अपेक्षेने गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीने बाजाराला पुन्हा ‘अच्छे दिन’ आले. बँकांच्या शेअरच्या जोरदार खरेदीने सेन्सेक्सने गेल्या तीन आठवडयांमध्ये एका दिवसात सर्वाधिक ४६७.५१ अंकांची कमाई केली आणि तो २४,६८४.८५वर बंद झाला. तर निफ्टी १३२.५५ अंकांची वाढ नोंदवत ७,३६२.५०वर बंद झाला.
आर्थिक विकासदराने सलग दुस-या वर्षी पाच टक्क्यांच्या खाली डुबकी घेतली. मात्र या आकडेवारीकडे गुंतवणूकदारांनी दुर्लक्ष करत आठवडाभराचा उच्चांकी स्तर गाठला. मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्यात नवीन सरकार यशस्वी होईल या आशेवर भारतीय शेअर बाजारातील खरेदीचा जोर कायम असल्याचे कोटक सिक्युरिटीजच्या प्रायव्हेट क्लायंट ग्रुप रिचर्सचे उपाध्यक्ष संजीव झरबाडे यांनी सांगितले. तसेच मेमध्ये कारखाना उत्पादन सुधारत असल्याचा एचएसबीसीचा अंदाजही बाजाराला कलाटणी देणारा ठरला.
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाच्या वाढीत एल अँड टीची कामगिरी सरस ठरली. या शेअरने ६.२३ अंकांची वाढ नोंदवली. कंपनीने शेवटच्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी नोंदवली. याबरोबरच मंगळवारी आरबीआयकडून द्वैमासिक पतधोरण जाहीर केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर बँकांच्या शेअरने चांगली कमाई केली. आरबीआयकडून लवकरच व्याजदर कपातीस सुरुवात केली जाईल, ही आशा गुंतवणूकदारांमध्ये बळावली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच शुक्रवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बाजारात २.९७७.६२ कोटी रुपयांची खरेदी केल्याच्या शेअर बाजारांच्या आकडेवारीने बाजारात नवी उमेद निर्माण झाली.
या वर्षी चीनच्या उत्पादन क्षेत्राचा विकास वेगाने होईल, या अंदाजाने आशियाई बाजारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. जपान, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया या बाजारांनी उसळी घेतली. यातून भारतीय बाजारांनाही प्रेरणा मिळाली. तर चीन, हाँगकाँग आणि तायवान या शेअर बाजारांना सुट्टी होती. सेन्सेक्समधील ३०पैकी २४ कंपन्यांचे शेअर वाढीसह बंद झाले. भारती एअरटेल (५.५२ टक्के), ओएनजीसी (५.१७ टक्के), टाटा स्टील (४.४२ टक्के), एसबीआय (४.२३ टक्के) यांच्या शेअरमध्ये वाढ झाली.
रिझव्र्ह बँकेकडून मंगळवारी पतधोरण जाहीर होणार असून लवकरच व्याजदर कपातीला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. – जिग्नेश चौधरी, संशोधन प्रमुख, वेरासिटी ब्रोकिंग सव्र्हिस