एकूण देशांतर्गत उत्पादनाची (जीडीपी) आकडेवारी आणि रिझव्र्ह बँकेच्या पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी विक्री शुक्रवारीही सुरू राहिली.
मुंबई– एकूण देशांतर्गत उत्पादनाची (जीडीपी) आकडेवारी आणि रिझव्र्ह बँकेच्या पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी विक्री शुक्रवारीही सुरू राहिली. निवडणुकीच्या कालावधीत आलेल्या तेजीच्या लाटेत मोठी कमाई केलेल्या बँकांच्या शेअरवर विक्रीचा दबाव राहिला. यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांकाने १७ अंकांची घट दर्शवत गेल्या चार महिन्यातील सर्वात निराशाजनक साप्ताहिक कामगिरीची नोंद केली.
परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या काही सत्रांपासून विक्रीचा जोर वाढवला आहे. तसेच बाजारात तेजी लहर आणणारी घडामोडही नसल्याने वातावरण नकारात्मक राहिल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. सेन्सेक्स १७ अंकांनी घसरून २४,२१७.३४ अंकांवर, तर निफ्टी ५.७० अंकांच्या घटीसह ७,२२९.९५वर बंद झाला. सेन्सेक्स चढ-उतारांनी भरलेला राहिला. दिवसभरात निर्देशांकाने ११९ अंकांची वाढ नोंदवली होती. आठवडाभरात बाजाराने ४७६.०९ अंक गमावले. ३१ जानेवारी २०१४नंतरची ही सर्वात मोठी साप्ताहिक घसरण ठरली.
बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, एसबीआय, पीएनबी, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक आणि फेडरल बँक यांना विक्रीची झळ बसली. यामुळे बँक क्षेत्राचा निर्देशांक २७३.७७ अंकांनी घसरला. दरम्यान, रुपयानेही डॉलरच्या तुलनेत आठ पैशांची घट नोंदवत ५९.११वर बंद झाला.