ग्रीस संकटाची चिंता बाजूला सारत सरकारच्या ‘सर्वांसाठी घर’ आणि स्मार्टसिटी प्रकल्पाला सुरुवात केल्याच्या घोषणेने गुरुवारी बाजारात पुन्हा तेजीचे पडसाद उमटले.
मुंबई- ग्रीस संकटाची चिंता बाजूला सारत सरकारच्या ‘सर्वांसाठी घर’ आणि स्मार्टसिटी प्रकल्पाला सुरुवात केल्याच्या घोषणेने गुरुवारी बाजारात पुन्हा तेजीचे पडसाद उमटले.
आठ सत्रांतील घोडदौडीतून विश्रांती घेणा-या मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने १६६ अंकांची झेप घेतली आणि तो २७,८९५.९७वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही ३७.१५ अंकांची वाढ होऊन हा निर्देशांक ८,३९८वर बंद झाला.
बुधवारी सेन्सेक्स ७५ अंकांनी घसरला होता. दरम्यान, भांडवली वस्तू, बांधकाम, ऊर्जा, वाहन आणि रिफायनरी क्षेत्रातील कंपन्यांनी बाजाराला पुन्हा तेजीच्या मार्गावर आणले. आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र आशियाई बाजारांना घसरणीला सामोरे जावे लागले. तायवानच्या बाजारातच तेजी राहली. सेन्सेक्समधील ३०पैकी १७ शेअरमध्ये तेजी राहिली.
बजाज ऑटो, गेल, लार्सन अँड टुब्रो, एचडीएफसी, वेदांता, एचडीएफसी बँक, डॉ. रेड्डीज, लुपीन, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि हिरो मोटोकॉर्प यांच्या शेअरमध्ये वाढ झाली. विप्रो, सिप्ला, एचयूएल, ओएनजीसी आणि एनटीपीसी यांना घसरणीला सामोरे जावे लागले.