जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दर यंदा घसरण्याची शक्यता बुधवारी जागतिक बँकेने आपल्या अहवालात व्यक्त केली आहे.
मुंबई – जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दर यंदा घसरण्याची शक्यता बुधवारी जागतिक बँकेने आपल्या अहवालात व्यक्त केली आहे. त्याचा परिणाम म्हणून सेन्सेक्समध्ये सलग दुस-या दिवशी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७९ अंशांनी घसरून २७,३४६.८२ अंशांवर बंद झाला.
जागतिक अर्थव्यवस्थेत होणारी घसरण आणि तेलाचे घसरणारे भाव रोखण्यासाठी कोणतेही प्रयत्न करणार नाही, असे ‘ओपेक’ने जाहीर केल्याने त्याचा परिणाम बाजारावर झाला. जूनपासून तेलाच्या भावात ५० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी २७,४३२.१४ अंशांवर उघडला. दिवसभरात तो २७,२०३ पर्यंत वर गेला. दिवसअखेर तो २७,३४६.८२ अंशांवर बंद झाला. गेल्या दोन दिवसांत सेन्सेक्समध्ये २३८.४५ अंशांची घट झाली आहे. निफ्टी २१.८५ अंशांनी घसरून तो ८२७७.५५ अंशांवर बंद झाला.
सरकारने सुट्टय़ा सिगारेटच्या विक्रीवर बंदी घालण्याचा आणि सिगारेट पिण्याचे वय वाढवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे सिगारेट निर्मितीतील बडी कंपनी आयटीसीचा समभाग तीन टक्क्याने घसरला. तांबे व तेलाच्या किमती घसरल्याने यंदा जागतिक अर्थव्यवस्थेची यंदा घसरण होणार आहे.
सेसा स्टरलाईट, हिंदाल्को, टाटा स्टील, आयटीसी, विप्रो, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, सिप्ला आदी कंपन्यांच्या समभागात घसरण झाली. तर हिंदुस्थान युनिलिव्हर, भेल, इन्फोसिस, बजाज ऑटो, मारुती-सुझुकी, ओएनजीसीच्या किमतीत सुधारणा झाली. बाजारात बुधवारी १५९९ समभागांचे भाव घसरले तर १२५९ समभागांचे भाव वधारले. दिवसभरात ३२०५.६२ कोटी रुपयांचे व्यवहार झाले.