अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी आणि आशियाई बाजारातील तेजी या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात सकारात्मक वातावरण राहिले.
मुंबई- अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी आणि आशियाई बाजारातील तेजी या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात सकारात्मक वातावरण राहिले. या पार्श्वभूमीवरमुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने शुक्रवारी २८ हजारांच्या स्तराला स्पर्श केला आणि सत्राअखेर हा निर्देशांक १४८.१५ अंकांच्या वाढीसह २७,९५७.५०वर बंद झाला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ३७.९५ अंकांच्या वाढीसह ८,४५८.९५वर बंद झाला.
माहिती-तंत्रज्ञान, औषध निर्माण, भांडवली वस्तू, रिफायनरी आणि तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरमध्ये चांगली खरेदी दिसून आली. तर ग्राहकोपयोगी वस्तू, बँकिंग, बांधकाम आणि धातू क्षेत्रातील शेअरमध्ये नफेखोरी झाली. एचडीएफसी हा सेन्सेक्समधील सर्वाधिक वाढ नोंदवणारा शेअर ठरला.
या शेअरमध्ये २.५१ टक्के वाढ झाली, तर टीसीएसमध्ये २.४२ टक्क्यांची वाढ झाली. मात्र चौथ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करूनही भारतीय स्टेट बँकेच्या शेअरला घसरणीला सामोरे जावे लागले. दरम्यान, सेन्सेक्सने सलग तीन सप्ताहात तेजी राहिली असून या आठवडय़ात ६३३.८० अंकांची वाढ झाली.