दक्षिण मुंबईतल्या सरकारी ऑफिसमधील कर्मचा-यांमधील हार्टअॅटॅकच्या घटना या पार्श्वभूमीवर सीएसटी येथील सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये दहा खाटांचे अत्याधुनिक ट्रॉमा केअर सेंटर सुरू झाले आहे.
मुंबई- दक्षिण मुंबईला असलेला अतिरेकी हल्ल्याचा धोका, रेल्वेचे वाढते अपघात, दक्षिण मुंबईतल्या सरकारी ऑफिसमधील कर्मचा-यांमधील हार्टअॅटॅकच्या घटना या पार्श्वभूमीवर सीएसटी येथील सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये दहा खाटांचे अत्याधुनिक ट्रॉमा केअर सेंटर सुरू झाले आहे.
दक्षिण मुंबईतील सरकारी रुग्णालयांमधील हे एकमेव ट्रॉमा सेंटर आहे. त्यामुळे भविष्यात या सेंटरचा अंसख्य मुंबईकरांना फायदा होणार आहे.
मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या काळात जखमींवरील उपचारांमध्ये, तसेच दररोज होणा-या रेल्वे अपघातातील जखमींवर उपचार करण्यात या हॉस्पिटलची मोलाची भूमिका असते. सीएसटीपासून जवळच्या स्टेशनमध्ये गंभीर जखमी होणा-या रुग्णांना याच रुग्णालयामध्ये दाखल केले जाते.
या रुग्णालयामधील कॅज्युअल्टी विभागाचे (अपघात विभाग) आधुनिकीकरण करून ट्रॉमा विभाग सुरू करण्यात आला आहे. हा संपूर्ण विभाग एसी आहे. त्यात व्हेंटिलेटर, व्हॅक्यूम सेक्शन, सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम, ईसीजी मॉनिटर, ऑपरेशन थिएटरही आहे. २४ तास डॉक्टरांची टीम आहे. सर्व प्रकारची आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी हा विभाग सज्ज आहे.
जे. जे. रुग्णालय समूहाच्या अंतर्गत सेंट जॉर्ज रुग्णालय येते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत जे. जे. रुग्णालयाचाही वैद्यकीय मदतीचा हात मिळू शकेल. सीएसटीवर दररोज सरासरी सात लाख प्रवाशांची वर्दळ असते. पण, या स्टेशनवर रेल्वेची कोणतीही वैद्यकीय सेवा नाही.
प्रवासाच्या दरम्यान अनेकांना अस्वस्थ वाटते. त्यामुळे सीएसटीला उतरल्यावर प्रवासी सर्वप्रथम याच हॉस्पिटलमध्ये येतात. रेल्वे अपघातातील दोन ते तीन जखमींना दररोज या हॉस्पिटलमध्ये आणले जाते. सेंट जॉर्ज रुग्णालयात रोज विविध आजारांचे रुग्ण येतात.
मंत्रालय, बीपीटी, टपाल खात्यामध्ये कामावर असताना एखाद्या कर्मचा-याला हार्टअॅटॅक आला, तर कर्मचा-याला तत्काळ सेंट जॉर्जमध्ये आणले असता, अशा रुग्णांवर वेळीच उपचार होईल आणि ट्रॉमा केअर सेंटरचा अशा रुग्णांना फायदाच होईल, असे सेंट जॉर्ज रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सेंटरमधील सुविधा
० संपूर्ण विभाग एसी
० व्हेंटिलेटर, व्हॅक्यूम सेक्शन, सेंट्रल
० ऑक्सिजन सिस्टीम, ईसीजी मॉनिटर
०ऑपरेशन थिएटरची सोय
०२४ तास तज्ज्ञ डॉक्टरांची टीम