शालेय मुलांच्या मुंबई सुपर लीग कबड्डी स्पर्धेसाठी सेवाभावी वृत्तीने प्रोत्साहन देणारे कबड्डी क्षेत्रातील संघटक गोविंदराव मोहिते, मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय शेटे आणि माजी ज्युनियर राष्ट्रीय कबड्डीपटू किरण जिकमडे यांना ‘कबड्डीरत्न’ पुरस्काराने होणार आहे.
मुंबई – शालेय मुलांच्या मुंबई सुपर लीग कबड्डी स्पर्धेसाठी सेवाभावी वृत्तीने प्रोत्साहन देणारे कबड्डी क्षेत्रातील संघटक गोविंदराव मोहिते, मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय शेटे आणि माजी ज्युनियर राष्ट्रीय कबड्डीपटू किरण जिकमडे यांना ‘कबड्डीरत्न’ पुरस्काराने होणार आहे.
सुवर्णमुद्रा, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांच्या हस्ते कबड्डी दिनी (१५ जुलै) सायंकाळी पाच वाजता आरएमएमएस सभागृह, आंबेकर मार्ग, परेल हा पुरस्कार दिला जाणार आहे. यावेळी कबड्डी संघटक गणपत लाड, अरुण दळवी, श्रेयस म्हसकर व भारत संधाने यांना कबड्डी गुणगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
कबड्डीतील सात मान्यवरांचा सत्कार सोहळा आयडियल स्पोर्ट्स अॅकॅडमी व स्पोर्ट्स असोशिएशन फॉर इंडियन स्कूल चिल्ड्रेन यांच्या वतीने तसेच राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सहकार्याने होणार आहे. यावेळी मुंबई शहर कबड्डी संघटनेत अविरत कार्य करणारे माजी ज्येष्ठ सदस्य दत्ता देवधरे यांचा ‘पंच्याहत्तरी’निमित्त विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच शालेय मुलांसाठी झालेल्या मोफत कबड्डी नियमांवर आधारित प्रश्नोत्तरे स्पर्धेमधील १० विजेत्यांना माजी क्रिकेटपटू अनंत भालेकर, कबड्डीप्रेमी निवृत्ती देसाई व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत गौरवले जाणार आहे.