स्पॉटफिक्सिग व सट्टाप्रकरणी तपास करत असलेले दिल्ली पोलिस (विशेष दल) व मुंबई गुन्हे शाखा या दोघांच्याही तपासात अश्विन अगरवाल ऊर्फ टिंकू या सट्टेबाजाचे नाव पुढे आले आहे.
स्पॉटफिक्सिग व सट्टाप्रकरणी तपास करत असलेले दिल्ली पोलिस (विशेष दल) व मुंबई गुन्हे शाखा या दोघांच्याही तपासात अश्विन अगरवाल ऊर्फ टिंकू या सट्टेबाजाचे नाव पुढे आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, टिंकू हा सुनील दुबई या मोठय़ा सट्टेबाजाचा अत्यंत विश्वासू साथीदार आहे. यापूर्वीही सट्टेबाजीच्या अनेक प्रकरणांत सुनील दुबईचे नाव समोर आले आहे. तरीही आतापर्यंत कधीही त्याला अटक झालेली नाही. त्यामुळे काहींच्या वरदहस्तामुळेच त्याला अटक होत नाही, अशी चर्चा सध्या पोलिसांत सुरू आहे.
आयपीएल सामन्यांत स्पॉटफिक्सिग व सट्टा लावल्याबद्दल आतापर्यंत ३ खेळाडू व २०हून अधिक सट्टेबाजांना अटक झाली आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास सुनील दुबईच्या नावापर्यंत थांबतो, अशी चर्चा आहे. गेल्या वर्षीही गुन्हे शाखेने आयपीएलदरम्यान अध्र्या डझन सट्टेबाजांना पकडले होते. त्यातील सोनू जालान व देवेंद्र कोठारी यांच्या चौकशीतही सुनील दुबईचे नाव पुढे आले होते. याशिवाय दोन वर्षापूर्वीच्या अंधेरीतील एका गुन्ह्यातही तो ‘वाँटेड’ आहे. या प्रकरणांनंतर सुनील दुबईविरोधात देशातील सर्व विमानतळांवर लूकआऊट नोटिस जारी करण्यात आली होती. या नोटिसीमुळे परदेशातून भारतात येण्याची सुनील दुबईची सर्व दारे बंद झाली आहेत. लूकआऊट नोटिस जारी केल्यानंतर परदेशातून देशात कोणत्याही विमानतळावर उतरल्यास संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्याचे अधिकार विमानतळ सुरक्षा यंत्रणांना मिळतात. त्यानंतर संबंधित आरोपीला तो ‘वाँटेड’ असलेल्या पोलिसांना सोपवण्यात येते. त्यासाठी आरोपीचे छायाचित्र व पासपोर्ट क्रमांक देशातील सर्व विमानतळांना सोपवण्यात येतो.
सहा महिन्यांच्या कालावधीसाठी जारी करण्यात येणा-या या लूकआऊट नोटिसीचे नूतनीकरण करावे लागते. सूत्रांच्या माहितीनुसार, दाऊदला अत्यंत जवळचा असणा-या सुनील दुबईला या वर्षीच्या आयपीएल मालिकांपूर्वी देशात यायचे होते. त्याने त्याच्याविरोधातील लूकआऊट नोटिसीचे नूतनीकरण न करण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. त्यासाठी गुन्हे शाखेच्या दोन वरिष्ठ अधिका-यांवर वरिष्ठांकडून दबावही टाकण्याचा प्रयत्नही केला गेला होता. पण त्यांनी या दबावाला न जुमानता सुनील दुबईच्या लूकआऊट नोटिसीचे नूतनीकरण केले. त्यानंतर दुबईने सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवण्याचाही प्रयत्नही केला होता. त्यासाठी दुबईतील भारतीय वकिलांपैकी काहींना त्यांनी हाताशी धरले होते. पण त्याचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. या जामीन अर्जात त्याने विला चेंबर, ३१७, ४३ स्ट्रीट, एमरेट गॅस स्टेशन, नेक्ट टू पब्लिक लायब्ररी, मनखल, दुबई हा त्याचा दुबईतील पत्ताही दिला होता.
सुनील दुबईचा पत्ता असतानाही त्याच्याविरोधात अद्याप रेड कॉर्नर नोटिस का बजावण्यात आली नाही, या प्रश्नाचा विचार केला, तर नक्कीच संशयाला वाव आहे. गेल्या अनेक वर्षापासून दुबईत राहून भारतातील सट्टेबाजीवर नियंत्रण ठेवणारा सुनील दुबई हा मूळचा मुंबईतील कुलाबा येथील राहणारा आहे. सुनील हिरानंद अभयचंदानी ऊर्फ सुनील दुबई फार वर्षापूर्वी दुबईला गेला तेव्हा तो फक्त जुगाराचा क्लब चालवायचा. त्यानंतर पाकिस्तानी सट्टेबाजाच्या संपर्कात आला आणि त्याचा सुनील दुबई झाला. तो सट्टेबाजीत शिरला. त्यासाठी ‘डी’ कंपनीशी त्याने जवळीक साधली व दाऊदचा अत्यंत विश्वासू बनला.
सट्टेबाजीच्या प्रकरणांतअधूनमधून नाव येणारा सुनील दुबई किती मोठा आहे, याचा प्रत्यय गुन्हे शाखेच्या पोलिसांना २००५ साली आला. २००५ साली पोलिसांनी कोटय़धीश बारबाला तरन्नुमला अटक केली. तिच्या अटकेमागेही खुसखुशीत किस्सा आहे. तरन्नुमचे काही कारणामुळे तिच्या सीएसोबत वाजले होते आणि तिने नवा सीए ठेवला. या प्रकारामुळे संतापलेल्या तिच्या जुन्या सीएने तरन्नुमच्या बेनामी संपत्तीबाबतची माहिती प्राप्तिकर विभागाला दिली. त्या वेळी प्राप्तिकर विभागाने तरन्नुमच्या नव्या सीएची चौकशी केली, त्या वेळी त्याने तरन्नुमकडे क्रिकेट बेटिंगमधून कमवलेला पैसा असल्याची लेखी माहिती प्राप्तिकर विभागाला दिली. त्यानंतर प्राप्तिकर विभागाने या संपूर्ण प्रकाराची माहिती गुन्हे शाखेला दिली व तरन्नुमला अटक झाली.
त्या वेळी श्रीलंकेचा गोलंदाज मुरलीधरनही वादाच्या भोव-यात सापडला होता. तरन्नुम ज्या बारमध्ये काम करायची, त्या बारमध्ये मुरलीधरनही यायचा. विशेष म्हणजे त्याला तेथे घेऊन येणा-या अभिनेत्याला बेटिंगमध्ये फार रस होता. मात्र चौकशीअंती मुरलीधरनला ‘क्लिनचीट’ देण्यात आली. विशेष म्हणजे सध्या सट्टेबाज प्रकरणी तपास करणारे पोलिस निरीक्षक नंदकुमार गोपाळेच या प्रकरणाचा तपास करत होते. त्या वेळीही तिने चौकशीदरम्यान सुनील दुबई तिचा गुरू असल्याचे सांगितले होते. दुबई हा क्रिकेटचा मोठा जाणकार असून त्यानेच दिलेल्या माहितीवरून तिने सट्टयात पैसे गुंतवून कोटय़वधींची मालमत्ता जमवल्याचे सांगितले होते. याशिवाय दाऊदसोबत त्याच्या संबंधांचीही माहिती दिली होती. तरीही सुनील दुबईकडे असलेला अरबो रुपयांचा काळा पैसा व उच्च वर्तुळातील लागेबांधे यामुळे सुनील दुबई आजही मोकाट फिरत आहे.