सिंधुदुर्गच्या पर्यटनाचा महामेरू ठरणारा ‘सी-वर्ल्ड’ प्रकल्प तोंडवळी-वायंगणी माळरानावर साकार होणार आहे. या प्रकल्पाच्या भूस्तर सर्वेक्षणाचे काम आठ दिवसांपूर्वी सुरू होऊन प्रकल्पाच्या कामाची नांदी झाली आहे.
आचरा- सिंधुदुर्गच्या पर्यटनाचा महामेरू ठरणारा ‘सी-वर्ल्ड’ प्रकल्प तोंडवळी-वायंगणी माळरानावर साकार होणार आहे. या प्रकल्पाच्या भूस्तर सर्वेक्षणाचे काम आठ दिवसांपूर्वी सुरू होऊन प्रकल्पाच्या कामाची नांदी झाली आहे. दरम्यान, प्रकल्पासाठी माती परीक्षणाचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या अहवालानंतर प्रकल्प उभारणीच्या कामाला वेग येणार आहे.
कोकणातील लोकांना जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध व्हावा, येथील सृष्टीसौंदर्य, कला, संस्कृती जागतिकस्तरावर पोहोचावी, या हेतूने पालकमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची ‘पर्यटन जिल्हा’ अशी ओळख व्हावी, यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्याच प्रयत्नाने तोंडवळी-वायंगणीच्या माळरानावर महत्त्वाकांक्षी असा ‘सी-वर्ल्ड’ प्रकल्प उभारला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर, सध्या प्रकल्पाच्या भूस्तर सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. येथील चार ठिकाणी ४०० मीटर अंतरावर ड्रिलिंग मशिन बसवून सात कर्मचा-यांद्वारे भूस्तर सर्वेक्षण आणि माती परीक्षणाचे काम केले जात आहे. मातीचे हे नमुने पुण्यात पाठवण्यात येणार आहेत.
प्रकल्पाच्या ठिकाणी चार पैकी एका ड्रिलिंग मशिनद्वारे १५० फुटांपर्यंत तर अन्य तीन मशिनद्वारे ४०-५० फुटांपर्यंत उत्खनन करण्यात आले आहे. १५० फूट उत्खनन केलेल्या ठिकाणी ४० फुटांपर्यंत जांभे कातळ, त्याखाली २० फुटांपर्यंत काळीमाती आणि त्यानंतर वाळू आढळून आली आहे. तर काळे कातळ मिळेपर्यंत हे उत्खनन केले जाणार असल्याचे येथील अधिकारी शिवाजी लाड आणि आनंद पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, प्रकल्पाच्या कामाला स्थानिक ग्रामस्थांकडून चांगला पाठिंबा मिळत आहे. भूस्तर सर्वेक्षणाच्या कर्मचा-यांना प्रकल्पस्थळ दाखवणे, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, कर्मचारी व कामगारांची राहण्याची सोय करणे, अशा अनेक गोष्टीत ग्रामस्थांचे सहकार्य मिळत असल्याचे लाड यांनी सांगितले.