मागील तीन वर्षात सीबीआयने सहसचिव आणि त्यापेक्षा वरच्या दर्जाच्या 129 सरकारी अधिका-यांविरोधात गुन्हे दाखल केले असून, यात 97 भ्रष्टाचाराची प्रकरणे आहेत.
नवी दिल्ली – मागील तीन वर्षात सीबीआयने सहसचिव आणि त्यापेक्षा वरच्या दर्जाच्या 129 सरकारी अधिका-यांविरोधात गुन्हे दाखल केले असून, यात 97 भ्रष्टाचाराची प्रकरणे आहेत. गुरुवारी राज्यसभेत ही माहिती देण्यात आली. भ्रष्टाचाराच्या 97 गुन्ह्यांपैकी 71 नियमित प्रकरणे असून 26 प्रकरणात प्राथमिक चौकशी करण्यात आल्याची माहिती कार्मिक गृहराज्यमंत्री नारायणसामी यांनी राज्यसभेत दिली.
गुन्हे दाखल करण्यात आलेल्या 129 अधिका-यांपैकी पंधरा अधिकारी एकापेक्षा जास्त गुन्हयात सहभागी आहेत. सीबीआयने 14 अधिका-यांविरोधात खटला चालविण्यासाठी मागितलेली परवानगी अद्याप प्रलंबित आहे. सहसचिव आणि त्यापेक्षा वरच्या दर्जाच्या 23 अधिका-यांविरुध्द चौकशीसाठी सीबीआयने परवानगी मागितली आहे पण अद्याप ही परवानगी देण्यात आलेली नाही अशी माहिती नारायणसामी यांनी दिली. 71 नियमित प्रकरणांपैकी 30 प्रकरणात 31 अधिका-यांविरुध्द आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सहसचिव व त्यापेक्षा वरच्या दर्जाचे हे अधिकारी आहेत.