उरण ते सीएसटी प्रवास करणा-यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र सीएसटी ते उरण या मार्गासाठी लोकलसेवा उपलब्ध नसल्याने उरणवासीयांना एसटी किंवा बोटीचा पर्याय निवडावा लागत आहे.
मुंबई – उरण ते सीएसटी प्रवास करणा-यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र सीएसटी ते उरण या मार्गासाठी लोकलसेवा उपलब्ध नसल्याने उरणवासीयांना एसटी किंवा बोटीचा पर्याय निवडावा लागत आहे. या मार्गावर लोकलसेवा सुरू करावी, ही उरणवासीयांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. मात्र ही मागणी आता लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.
यासाठी सिडको आणि मध्य रेल्वेच्या वतीने अंदाजे अठराशे कोटींचा खर्च होणार असून त्यापैकी ३८० कोटी रुपयांचे काम पूर्ण झाले आहे. यात मध्य रेल्वेकडून १७५ कोटी तर सिडकोकडून २०५ कोटी खर्च करण्यात आले आहेत. या अठराशे कोटींमध्ये गाडींच्या डब्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
या प्रकल्पातील रेल्वे मार्ग उभारण्याचे काम मध्य रेल्वेकडून करण्यात येणार असून रेल्वे स्थानकांची उभारणी सिडकोच्या वतीने उभारण्यात येणार आहे. सध्या मध्य रेल्वेकडून जमीन सपाटीकरणाचे आणि पुलाचे काम हाती घेण्यात आले असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले आहे.