भारताची ऑलिंपिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने वुहानमध्ये सुरू असलेल्या बॅडमिंटन आशिया स्पर्धेत विजयी सलामी दिली.
नवी दिल्ली- भारताची ऑलिंपिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने वुहानमध्ये सुरू असलेल्या बॅडमिंटन आशिया स्पर्धेत विजयी सलामी दिली. मात्र अनुभवी सायना नेहवालला पहिल्याच फेरीत बाहेरचा रस्ता धरावा लागला.
महिला एकेरीत फॉर्मात असलेल्या चौथ्या सीडेड सिंधूला पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या डिनर आयुस्टाईनला हरवण्यासाठी केवळ ३१ मिनिटे लागली. बिनसीडेड आयुस्टाईनवर तिने २१-८, २१-१८ असा सहज विजय मिळवला.
सातवी सीडेड सायनाचे बिनसीडेड जपानच्या सायाका सॅटोविरुद्ध पारडे जड होते. आजवरच्या लढती पाहता तिने प्रतिस्पर्ध्यावर ६-१ अशी आघाडी घेतली होती. मात्र बुधवारी सायनाचा दिवस नव्हता. त्यामुळे सॅटो वरचढ ठरली. सायनाला २१-१९, १६-२१, १८-२१ असा पराभव पाहावा लागला. ही लढत एक तास आठ मिनिटे चालली.