सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तर…
सिंधुनगरी- सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तर आरोग्य विभागासाठी २४ लाखाची गरज असून आगामी अर्थसंकल्पात तेवढा निधी मिळावा, अशी मागणी केल्याची माहिती आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी आरोग्य समितीच्या सभेत दिली.
आरोग्य समितीची सभा गुरुवारी येथील समिती सभागृहात सभापती गुरुनाथ पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या वेळी प्रमोद कामत, भारती चव्हाण, रेश्मा जोशी, जान्हवी सावंत, निकिता जाधव आदी सदस्य उपस्थित होते.
जिल्हयात लेप्टो, डेंग्यू, हिवतापाचे रुग्ण सापडले. मात्र या वर्षात म्हणजे जानेवारीपासून सापडलेले सर्व रुग्ण बरे झाल्याचे आरोग्य अधिका-यांनी सांगितले. संशयित डेंग्यूचे ४९ रुग्ण तर डेंग्यूचे निदान निश्चित झालेले १६ मिळून ६५ रुग्ण या जिल्हयात आढळले. त्यातील ४ रुग्णच जिल्हयातील असून अन्य ६४ रुग्ण जिल्हयाबाहेर लागण झालेले होते. मात्र हे सर्व रुग्ण औषधोपचाराने बरे झाल्याचे सांगण्यात आले. मलेरियाचे १३६ रुग्ण आढळले होते, तेही उपचाराअंती बरे झाले. जिल्हयात सध्या कोणतीही साथ नाही, अशीही माहिती देण्यात आली. कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया उद्दिष्टपूर्तीमध्ये ४६ टक्के, तर लसीकरणामध्ये ५० टक्के काम झाल्याची माहिती देण्यात आली. दूषित पाणी नमुन्यामध्ये राज्याच्या तुलनेत सिंधुदुर्गात हे प्रमाण कमी आहे. राज्यात हे प्रमाण १० टक्के, मात्र सिंधुदुर्गात हे प्रमाण ५.९ टक्के आहे.
जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिका-यांच्या मारहाण प्रकरणी पोलिसांची संशयास्पद भूमिका होती. याबाबत पोलीस अधीक्षकांना कळवा असाही निर्णय या सभागृहाने घेतला.