पंजाबमधील घुमानमध्ये होणा-या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे यांची निवड झाली आहे.
पुणे – पंजाबमधील घुमानमध्ये होणा-या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत मोरे यांना सर्वाधिक ४९८ मते मिळाली.
या निवडणुकीत डॉ. सदानंद मोरे यांच्यासह भारत ससाणे, पुरुषोत्तम नागपुरे आणि डॉ. अशोक कामत रिंगणात होते. पहिल्या फेरीत मोरे यांना सर्वाधिक ४९८ मते मिळाली तर ससाणे यांना ४२७ मते मिळाली. डॉ. अशोक कामत यांना या निवडणुकीत ६५ तर पुरुषोत्तम नागपुरे यांना दोन मते मिळाली.
डॉ. सदानंद मोरे हे संत तुकाराम महाराज यांचे वंशज असून ‘द गीता-अ थिअरी ऑफ ह्युमन अॅक्शन’ या विषयावर त्यांनी पी.एच.डी.चे संशोधन केले आहे. सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठी त्यांना ‘गुरुदेव दामले’ पुरस्कार मिळाला आहे. तसेच ‘कृष्ण : द मॅन अँड हिज मिशन’ या विषयावरही त्यांनी संशोधन केले आहे. पुणे विद्यापीठाचे समन्वयक प्राध्यापक म्हणून ते बरीच वर्ष कार्यरत होते. तुकाराम दर्शन या ग्रंथांसाठी त्यांना साहित्य अकादमीसह एकूण १५ पुरस्कार मिळाले आहेत.
पुढील वर्षी तीन ते पाच एप्रिलदरम्यान संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या पंजाबमधील घुमान येथे हे मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे.