सायन-पनवेल महामार्गाच्या रुंदीकरणाचे कामा संदर्भात बैठक घेण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे
पनवेल – सायन-पनवेल महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. पनवेल तालुक्याच्या हद्दीत या महामार्गावर असलेल्या नागरी वसाहती आणि त्यांच्या समस्यांसंदर्भात आढावा बैठक घेण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री रणजित कांबळे यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. आमदार ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सायन-पनवेल महामार्गाचे ‘बांधा-वापरा आणि हस्तांतरण करा’ या तत्त्वावर काम सुरू आहे.
हे काम संथगतीने होत असल्याने या महामार्गावर प्रवास करणा-या प्रवाशांना सातत्याने निरनिराळय़ा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या महामार्गाचे रुंदीकरण व त्या अनुषंगाने प्रवाशांना द्यायच्या सोयी-सुविधांसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन लवकरात लवकर होण्याची आवश्यकता आहे. या बैठकीचे आयोजन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिका-यांच्या उपस्थित करण्यात यावे, असेही आमदारांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.