पंजाबमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करून कारमधून फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
![rape](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/12/rape.jpg)
भटिंडा- पंजाबमधील पतियाला गँगरेप आणि आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच मोगा जिल्ह्यात रविवारी एका २६ वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून कारमधून फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
चंडीगड येथे परिचारिकेच्या पदासाठी मुलाखत देण्यासाठी आलेल्या मोगा जिल्ह्यातील या तरुणीवर बलात्कार करणा-या नराधमांनी या तरुणीला भटिंडा-डबावाली रस्त्यावर संगत मंडी येथे फेकून दिले. स्थानिक नागरिकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. गिद्दरबहामधील माता साहिब कौर महाविद्यालयातून नर्सिंगचा कोर्स केलेली ही तरुणी भटिंडा सरकारी रुग्णालयात सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. सदर पिडीत तरुणी नुकतीच जामीनावर बाहेर आली होती.
चंडीगड येथे पिडीत तरुणी नर्सच्या नोकरीच्या मुलाखतीसाठी आली होती. शुक्रवारी सकाळी ती चंदीगढमधील सेक्टर ४३ येथे बस स्टॉपवर उतरली. तेथे ती पत्ता विचारत असताना तिला एका कारमधून आलेल्या दोन तरुण आणि दोन महिलांनी कारमध्ये बसवले. काही कळायच्या आत त्यांनी तिला गुंगी येणारे इंजेक्शन दिले.
ती जेव्हा शुध्दीवर आली तेव्हा एका रूममध्ये तिने चार तरुणांना बघितले. त्यांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा तसेच या घृणास्पद कृत्याचा एमएमएस तयार केल्याचा आरोप पिडीत तरुणीने केला आहे. दोन दिवस अत्याचार केल्यानंतर रविवारी सायंकाळी तिला कारमधून भटिंडा-डबावाली रस्त्यावर फेकून दिले.
वैद्यकीय तपासणीदरम्यान तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाल्याचे डॉक्टर पूनम ढिल्लॉं यांनी सांगितले.
पिडीत तरुणीने गिद्दरबहामधील माता साहिब कौर महाविद्यालयातून नर्सिंगचा कोर्स केला होता. रमा मंडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे भटिंडाचे पोलिस उपअधिक्षक गुरमित सिंग किंगरा यांनी सांगितले.
एक वर्षापूर्वी पंजाबमधील फाजिल्का येथे खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेली सदर पिडीत तरुणी नुकतीच जामीनावर बाहेर आली होती, असे भटिंडाचे विशेष पोलीस अधिक्षक रविचरण ब्रार यांनी सांगितले.
परिचारिकेची नोकरी करणा-या या तरुणीचे सुनील नावाच्या विवाहित तरुणाशी सूत जुळले होते. यादरम्यान सुनीलच्या पत्नीला एड्स झाल्याचे तपासणीत आढळले. तिने गुन्हा दाखल केला असता सुनील आणि या तरुणीला पोलिसांनी अटक केली. एक वर्षापूर्वी अटक झालेला सुनील तुरुंगातच असून या तरुणीला नुकतेच जामीनावर सोडण्यात आले होते.
मुलाखत देण्यासाठी चंदीगढला जात असताना सेक्टर ४३ येथे सुनीलची पत्नी व तिची आई आणि दोन अनोळखी तरुणांनी तिला जबरदस्तीने गाडीत बसवले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचे पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या या तरुणीच्या तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी पोलीस तपास चालू असल्याचे भटिंडाचे विशेष पोलीस अधिक्षक रविचरण ब्रार यांनी सांगितले.
पंजाबमधील २६ डिसेंबरला घडलेले पतियाला गँगरेप आणि आत्महत्या प्रकरण विस्मृतीत जाण्यापूर्वीच पून्हा सामूहिक बलात्कार प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.