क्रिकेट सामन्यादरम्यान गंभीर जखमी झालेल्या ईस्ट बंगाल क्लब क्रिकेटच्या अंकित केसरी या क्रिकेटपटूचे सोमवारी निधन झाले.
कोलकाता- क्षेत्ररक्षण करताना जखमी झालेला बंगालचा युवा क्रिकेटपटू अंकित केशरीचे सोमवारी निधन झाले. सॉल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या स्थानिक सामन्यात क्षेत्ररक्षण करताना अंकित जबर जखमी झाला होता.
तीन दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र सोमवारी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याची प्राणज्योत मावळली.
स्थानिक सामन्यात राखीव क्रिकेटपटू म्हणून क्षेत्ररक्षण करताना झेल घेण्याच्या प्रयत्नात अंकितची संघसहकाऱ्याशी धडक झाली. ही धडक इतकी जबदरस्त होती की, अंकितच्या तोंडातून रक्त यायला लागले. तसेच तो लगेचच बेशुद्ध पडला.
त्यानंतर अंकितला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तीन दिवस त्याची मृत्यूशी झुंज सुरू होती. रविवारी थोडे जेवल्याने अंकितच्या प्रकृतीत सुधारणा होईल असे वाटत होते. मात्र सोमवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचे निधन झाले.
अंकितने १९ वर्षाखालील कूचबिहार चषक क्रिकेट स्पर्धेत बंगाल संघाचे नेतृत्व केले होते. त्याशिवाय २०१४मध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या ज्युनियर विश्वचषक स्पर्धेसाठी निवडलेल्या संभाव्य संघातही २० वर्षीय अंकितचा समावेश होता.