भारत आणि श्रीलंकेत दुसरी वनडे गुरुवारी (६ नोव्हेंबर) रंगेल. धडाकेबाज सलामीनंतर सरदार पटेल स्टेडियमवर (मोटेरा) होणारी लढत जिंकून मालिकेत आघाडी घेण्यास विराट कोहली आणि सहकारी उत्सुक आहेत.
अहमदाबाद- भारत आणि श्रीलंकेत दुसरी वनडे गुरुवारी (६ नोव्हेंबर) रंगेल. धडाकेबाज सलामीनंतर सरदार पटेल स्टेडियमवर (मोटेरा) होणारी लढत जिंकून मालिकेत आघाडी घेण्यास विराट कोहली आणि सहकारी उत्सुक आहेत.
पहिल्या वनडेतील दमदार विजयानंतर भारताचा आत्मविश्वास चांगलाच उंचावला आहे. यजमानांची फलंदाजी बहरली. गोलंदाजांचीही चांगली साथ लाभली. मोटेरावरही भारताचे पारडे जड असले तरी सातत्य राखण्याचे मोठे आव्हान आहे. शिखर धवनला सूर गवसल्याने तसेच अजिंक्य रहाणे आणि सुरेश रैनाने सातत्य राखल्याने फलंदाजीबाबत चिंता नाही. कर्णधार कोहलीने पहिल्या वनडेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणे, पसंत केले.
नियोजित कर्णधार महेंद्रसिंग ढोणीच्या अनुपस्थितीत फलंदाजीचा क्रम तसाच राहण्याचे संकेत आहेत. कोचीत फलंदाजांनी विजय नक्की केला तरी गोलंदाजांनी चांगला मारा केला. इशांत शर्मा आणि उमेश यादव या मध्यमगती दुकलीने प्रभावी गोलंदाजी केली. मध्यमगती वरुण आरोनला दुखापत झाल्याने उर्वरित मालिकेला तो मुकला आहे. त्याच्या जागी अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीचा समावेश करण्यात आला असला तरी अंतिम संघात मुंबईचा मध्यमगती धवल कुलकर्णीला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. डावखुरा नवोदित फिरकीपटू अक्षर पटेलने प्रतिस्पर्धी संघातील कुमार संगकारा आणि माहेला जयवर्धनेला चांगलेच अडचणीत आणल्याने अष्टपैलू रवींद्र जडेजाला बाहेरच बसावे लागेल.
सरावाला फारच कमी वेळ मिळाल्याचे श्रीलंकेच्या कामगिरीवरून जाणवतेय. त्यांच्या प्रमुख फलंदाजांनी खूपच निराशा केलीय. पहिल्या वनडेत केवळ जयवर्धनेने यजमान गोलंदाजांचा थोडा फार प्रतिकार केला. भारताप्रमाणे फलंदाजी हेच पाहुण्या संघाचे बलस्थान आहे. त्यामुळे अनुभवी संगकारासह तिलकरत्ने दिलशान, कर्णधार अँजेलो मॅथ्यूज, उपुल थरंगा आणि सीकुजे प्रसन्नाला वेळीच कामगिरी उंचवावी लागेल. लंकेला वेगवान गोलंदाज लसित मलिंगा आणि जादुई फिरकीपटू अजंठा मेंडिसची अनुपस्थिती जाणवतेय. त्याच्या अनुपस्थितीत पाहुण्यांची गोलंदाजी कमकुवत झालीय. मात्र एक लढाऊ संघ अशी लंकेची ओळख आहे. त्यामुळे मॅथ्यूज आणि कंपनीने कामगिरी उंचावल्यास मालिका रंगतदार होईल.
वेळ : दु. १.३० वा. थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.