पंडित रोणू मजुमदार यांनी त्यांच्या कुटुंबासोबत व्यतीत केलेले क्षण, संगीत क्षेत्रातील दिग्गजांसोबत त्यांनी घालवलेले क्षण, स्वत: पंडितजींच्या प्रासंगिक मुद्रा या सगळ्यांची सुंदर मालिका छायाचित्रांद्वारे साकारण्यात आली आहे. मात्र सादरीकरणामध्ये हे पुस्तक अपयशी ठरलं आहे, असं जाणवतं.
प्रसिद्ध बासरीवादक पंडित रोणू मजुमदार हे संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध नाव. गेली ४० वर्षे ते या संगीत क्षेत्रात आहेत. आतापर्यंत अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. विविध गाण्यांना त्यांच्या बासरीची सुमधूर साथ मिळाली आहे. त्यांच्या या संपूर्ण सांगीतिक जीवनाचा आढावा ‘मंत्रमुग्ध : वुड वाइंड जर्नी ऑफ पंडित रोणू मजुमदार’ हा पुस्तकरूपी अल्बममध्ये घेण्यात आला आहे. मजुमदार यांचा सांगीतिक प्रवास, त्यांना भेटलेली संगीत क्षेत्रातील मंडळी, त्यांचे कुटुंब, त्यांना संगीत आणि बासरी वादन शिकवणारे गुरू हे सर्व या अल्बमरूपी पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेलं आहे, पण हा केवळ सांगीतिक आढावा नाही, तर त्यांचे वैयक्तिक जीवन आणि बासरी वादनाचा प्रवास या सर्वाचे एकत्रित चित्रण या पुस्तकात आहे.
पुस्तकाचं देखणं मुखपृष्ठ पाहून ते उलगडण्याची उत्सुकता वाढते. मात्र वाचक जसजशी पुस्तकाची पानं उलगडत जातो, तसतशा पुस्तकातील त्रुटी ठळकपणे दिसू लागतात. पंडित रोणू मजुमदार यांनी त्यांच्या कुटुंबासोबत व्यतीत केलेले क्षण, संगीत क्षेत्रातील दिग्गजांसोबत त्यांनी घालवलेले क्षण, स्वत: पंडितजींच्या प्रासंगिक मुद्रा या सगळ्यांची सुंदर मालिका छायाचित्रांद्वारे मांडण्यात आली आहे. मात्र सादरीकरणामध्ये हे पुस्तक अपयशी ठरलं आहे, असं जाणवतं.
मुखपृष्ठ वगळता या पुस्तकातील सर्व छायाचित्रं कृष्णधवल आहेत. त्यामुळे या पुस्तकात रंगीत पुस्तकं का वापरली नाहीत, असा प्रश्न सुरुवातीलाच पडतो. बरं, पुस्तकाची खुमारी वाढवण्यासाठी कृष्णधवल छायाचित्रं वापरली असावीत असं गृहीत धरलं तर तसंही कुठे दिसत नाही. रंगीत छायाचित्रं असती तर पुस्तकाचं देखणेपण नक्कीच वाढलं असतं असं जाणवल्याशिवाय राहत नाही. आणखी एक त्रुटी म्हणजे बहुधा पुस्तकाच्या पानांची संख्या वाढवण्यासाठी की काय, अनेक छायाचित्रे पुन्हा पुन्हा वापरण्यात आली आहेत. तसंच एका छायाचित्राची दोन दोन पानांमध्ये विभागणी केल्यामुळे दिसायलाही ते विचित्र दिसतं, शिवाय त्याचा योग्य परिणाम साधला जात नाही. पुस्तकात मजुमदार यांच्या आवडीची गाणी त्या चित्रपटांच्या पोस्टरसहित देण्यात आली आहेत. त्याची खरंच काही गरज होती, असं वाटत नाही. त्यातही काही ठिकाणी चित्रपटांची छायाचित्रं नाहीत, तिथे जागा रिकामी सोडण्यात आली आहे.
पुस्तकातील काही पानांवर केवळ एका ओळीची माहिती देण्यात आली आहे. संपूर्ण पान एका ओळीसाठी वाया घालवण्याऐवजी तेथे सविस्तर माहिती किंवा आणखी छायाचित्रं देता आली असती. या पुस्तकासोबत तुम्हाला एक सीडीही मोफत मिळणार आहे. त्यामुळे पंडितजींच्या बासरीवादनाचा श्रवणीय लाभ तुम्ही घेऊ शकता.
मंत्रमुग्ध : वुड वाइंड जर्नी ऑफ पंडित रोणू मजुमदार
इंडस सोर्स बुक
किंमत : २०० रुपये