येथील अहिल्यानगर उपनगरात मोटारसायकल ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून रविवारी रात्री ११ च्या सुमारास तरुणांच्या दोन गटांत झालेल्या सशस्त्र हाणामारीत एक युवक ठार झाला
सांगली – येथील अहिल्यानगर उपनगरात मोटारसायकल ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून रविवारी रात्री ११ च्या सुमारास तरुणांच्या दोन गटांत झालेल्या सशस्त्र हाणामारीत एक युवक ठार झाला, तर दोघे जबर जखमी झाले आहेत. अनिल पंढरीनाथ वाळुंजकर असे मृत युवकाचे नाव आहे. जखमीवर वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना अटक केली आहे.
अहिल्यानगर येथे रविवारी रात्री मोटारसायकलवरून चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक केल्याच्या कारणावरून अनिल वाळुंजकर याचा दोन युवकांशी वाद झाला. त्यावेळी दोन्ही युवकांनी मित्रांना बोलावून घेतले. त्यानंतर दोन गटांत वादावादी व सशस्त्र मारामारी झाली. त्यावेळी चाकूचा घाव वर्मी लागल्याने वाळुंजकर जबर जखमी झाला.
रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. स्वप्निल शिवाजी बुधले आणि योगेश कारंडे हे दोन युवक या हाणामारीत जबर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी संतोष पडळकर आणि भैराप्पा मडकरी यांना अटक केली.